बुलढाणा: मंगल वाद्यांचा निनाद, सेवाधारीसह वारकऱ्यांनी टाळ वर दिलेली संगत, हजारो भाविकांच्या मुखातून होणारा संत- विठुमाऊली अन गजानन महाराजांचा जयघोष अश्या राजवैभवी थाटात अन पारंपरिक दिमाखात शेगावच्या पालखीने आषाढी वारी साठी पंढरपूरकडे कूच केली.यंदा ५४ व्या वर्षात पदार्पण करणारी शेगावच्या राणाची ही पालखी तब्बल एक महिन्याच्या पायदळ प्रवासानंतर २७ जूनला पंढरपूर ला पोहोचनार आहे.
आज ज्येष्ठ शुद्ध सप्तमी अर्थात २६ मे रोजी रोजी पारंपरिक पद्धतीने प्रस्थान सोहळा पार पडला. संत गजानन महाराज मंदिरात विधिवत पूजन करून ‘श्री’च्या रजत मुखवटा सुशोभीत पालखीत विराजमान करण्यात आला. टाळ मृदुंग, तुतारी, ढोल नगारे,बँड च्या निनादात व जयघोषात आणि भगव्या पताकाधारी वारकाऱ्यांसह पालखी निर्धारित मार्गाने रवाना झाली.
हेही वाचा >>>नागपूर: पटोलेंच्या विरोधात वडेट्टीवार समर्थक दिल्लीत
पालखी २७ जूनला श्री क्षेत्र पंढरपूर मध्ये डेरेदाखल होणार आहे. तेथील गजानन महाराज संस्थान शाखेत २ जुलै पर्यंत पालखी मुक्कामी राहणार आहे. ३ जुलै रोजी परतीच्या प्रवासाला निघणारी पालखी २३ जुलै रोजी खामगाव( जिल्हा बुलढाणा) मुक्कामी राहील. २४ जुलै ला ती स्वगृही शेगावात परतणार आहे.