लोकसत्ता टीम

बुलढाणा : कोणतीही निवडणूक लढविणे सोपं नसते. मात्र लढविनाऱ्या सर्व उमेदवारांचे जिंकण्यापूर्वी लक्ष्य राहते ते ‘डिपॉझिट’ वाचविणे! मात्र यंदाच्या निवडणुकीत केवळ तीनच उमेदवारांना नामुष्की टाळता आली आहे. उर्वरित तब्बल अठरा उमेदवाराना पराभवासह अनामत रक्कम गमावण्याची नामुष्की सहन करावी लागली आहे.

सहा विधानसभा मतदारसंघाचा समावेश असलेल्या बुलढाणा लोकसभा मतदारसंघातील लढतीत यंदा दहा बारा नव्हे तब्बल एकवीस जण रिंगणात उतरले होते. त्यामध्ये अकरा पक्षीय तर दहा अपक्षांचा समावेश होता. बुलढाणा लोकसभेच्या चुरशीच्या तिरंगी लढतीत प्रतापराव गणपतराव जाधव यांना ३ लाख ४९ हजार ८६७ मते मिळाली. खासदार जाधव यांनी सलग चौथ्यांदा विजयी होण्याचा विक्रम करीत २९ हजार ४७९ मतांनी विजय मिळविला. त्यांनी काँग्रेस नेते शिवराम राणे यांचा सलग तीनदा विजयी होण्याचा विक्रम मोडीत काढला.

आणखी वाचा-अकोला : केंद्रीय मंत्रिपदाची माळ कुणाच्या गळ्यात? शिवसेना शिंदे गटाकडून…

जाधवांचे निकटचे प्रतिस्पर्धी महाविकास आघाडीचे नरेंद्र दगडू खेडेकर( उबाठा) यांना ३ लाख २० हजार ३८८ मते मिळालीत. अपक्ष लढणाऱ्या रविकांत तुपकर या शेतकरी नेत्याने अडीच लाखांच्या आसपास (दोन लाख, एकोनपन्नास नऊशे त्रेशष्ट) मते सर्वांना थक्क केले. यातील नरेंद्र खेडेकर व रविकांत तुपकर पराभूत झाले असले तरी त्यांचे ‘डिपॉझिट’ वाचले असून त्यांना निवडणूक विभागाकडून प्रत्येकी पंचविस हजार रुपये परत मिळणार आहे. मात्र इतर अठरा उमेदवारांनी भरलेली अनामत रक्कम मात्र जप्त होणार आहे.

हे आहे गणित

सर्वसाधारण उमेदवार करिता २५ हजार तर मागासवर्गीय करिता १२ हजार ५०० रुपये इतकी अनामत रक्कम होती. मतदारसंघात झालेल्या एकूण मतदानपैकी वैध मतांच्या १/६ पेक्षा जास्त मतदान मिळाल्यास अमानत रक्कम परत मिळते किंवा जप्त होत नाही. असे डिपॉझिट जप्त चे गणित आहे. वरकरणी हे गणित सोपे असले तरी तिथपर्यंत मजल मारणे हे कठीण असते. निकालानंतर भल्याभल्याना याची जाणीव होते. यंदाच्या २०२४ लढतीत ११ लाख ९ हजार ४९६ मते वैध ठरली होती. त्यामुळे १/६ च्या समीकरण नुसार जप्ती (आणि नामुष्की ) वाचविण्यासाठी १ लाख ८४ हजार ९१६ इतके मतदान मिळणे आवश्यक होते. एका उमेदवाराने विजय मिळवून तर दोघांनी पराभूत होऊन सुद्धा ती लक्ष्मण रेषा ओलांडली!

आणखी वाचा-धरणांमधील जलसाठा होतोय कमी, अमरावती विभागात टँकरची शंभरी

वंचित सह १८ जणांवर ‘जप्तीची कारवाई’

यंदाच्या निवडणुकीत ९८ हजार ४४१ मतदान घेऊनही वंचित आघाडीचे वसंत मगर यांना जप्तीची नामुष्की टाळता आली नाही. अनामत रक्कम जप्त झालेले अन्य उमेदवार व त्यांना मिळालेली मते पुढीलप्रमाणे आहे.

  • गौतम मघाडे (बहुजन समाज पार्टी) – ८हजार २१८, असलम शाह हसन शाह (महाराष्ट्र विकास आघाडी) – ६ हजार १५३
  • मच्छिंद्र मघाडे (सोशालिस्ट पार्टी इंडिया) – ५ हजार २५८
  • माधवराव बनसोडे (बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी) – २ हजार ४५५
  • मोहम्मद हसन इनामदार (मायनॉरिटीज डेमोक्रॅटक पार्टी) – ४ हजार ९७८
  • विकास नांदवे (भीम सेना) – २ हजार ३३१,सुमन तिरपुडे (पीपल्स पार्टी ऑफ इंडिया) – १ हजार ५११
  • संतोष इंगळे (रिपब्ल‍िकन पार्टी ऑफ इंडिया) – २ हजार ५३०, अशोक हिवाळे (अपक्ष) – १५ हजार ४३६
  • उध्दव आटोळे (अपक्ष) – १ हजार ९६८,गजानन धांडे (अपक्ष) -४ हजार ८५४
  • दिनकर संबारे (अपक्ष) -४ हजार ५६४,नंदु लवंगे (अपक्ष) – ५ हजार ७१३
  • प्रताप पाटील (अपक्ष) – २ हजार ५६१,बाळासाहेब इंगळे (अपक्ष) – ३ हजार ९३१, रेखा पोफळकर (अपक्ष) – १ हजार ५४०
  • संदीप शेळके (अपक्ष) – १३ हजार ५०.