सकाळच्या शपथविधीवर मला जे सांगायचे होते ते मी सांगितले आहे. मात्र अशा गोष्टींवर रोज चर्चा करायची नसते. त्याची योग्य वेळ असते. अशी योग्य वेळ आली की सगळ्या गोष्टी सांगणार आहे, असा सूचक इशारा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला. फडणवीस शनिवारी सायंकाळी नागपुरात आले असता ते प्रसार माध्यमांशी बोलत होते.
हेही वाचा- शिंदे- फडणवीस सरकारकडे आमच्यासाठी वेळ नाही! संघप्रणीत कामगार संघाकडून नाराजी
ते म्हणाले, कसबा आणि चिंचवडमध्ये आम्ही जिंकणार असल्याने विरोधकांनी रडीचा डाव सुरू केला आहे. ज्यावेळी पायाखालची वाळू सरकते त्यावेळी पैसे वाटल्याचे आरोप केले जातात. मात्र, हे आरोप भाजपवर नाही तर मतदारांवर आहेत. पैसे वाटणे ही आमची संस्कृती नाही. मतदारांचा असा अपमान करण्याचा कुठलाही अधिकार काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसला पक्षाला नाही. भारतीय जनता पक्षाचा उमेदवार निवडणूक जिंकेल किंवा हरेल मात्र पैसे वाटणार नाही. कसब्यात आचारसंहितेचे खुले उल्लंघन करण्यात आल्याचेही फडणवीस म्हणाले.