नागपूर: शिवसेनेच्या ‘ऑपरेशन टायगर’ला विदर्भात नमनालाच अडथळा आला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे २० फेब्रुवारीला नागपूर दौऱ्यावर होते. पण अचानक त्यांचा रद्दा एक दिवस पुढे ढकलण्यात आला आहे. ते २१ ला येणार आहे. मात्र त्याचे कारण मात्र कळू शकले नाही. पण दौरा पुढे ढकलण्याला भाजप-सेनेतील विसंवाद कारणीभूत तर नाही ना ? अशी शंका व्यक्त केली जात आहे.
शिवसेनेचे ‘ऑपरेशन टायगर’ सध्या राज्यात चर्चेत आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील पदाधिकाऱ्यांना गळाला लावून त्यांचा पक्षप्रवेश घडवून आणने हा उद्देश शिवसेनेच्या शिंदे गटाचा आहे. हेच ऑपरेशन विदर्भात राबवण्याच्या हेतूने शिंदे यांचा विदर्भ दौरा आयोजित करण्यात आला होता. पूर्वी ठरलेल्या दौऱ्यानुसार गुरुवारी २० फेब्रुवारीला एकनाथ शिंदे नागपूर जिल्ह्यातील रामटेक मतदारसंघात कन्हान येथे आभार सभा घेणार होते. या दौऱ्याची जय्यत तयारी शिवसेनेतर्फे करण्यात आली आहे. शिंदे यांच्या स्वागतासाठी विमानतळामार्गावरील उड्डाण पुलावर शिंदे यांचे स्वागत फलक लावण्यात आले आहे. या सभेत नागपूरसह विदर्भातील ठाकरे गटाचे काही प्रमुख नेते शिंदे गटात प्रवेश करणार, असे रामटेकचे शिवसेनेचे आमदार व मंत्री आशीष जयस्वाल यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले होते. त्यामुळे शिंदेच्या दौऱ्याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. मात्र बुधवारी अचानक शिंदे यांचा २० तारखेचा दौरा रद्द झाल्याचे वृत्त धडकले.
सुधारित दौऱ्यानुसार ते २१ तारखेला येणार आहे. ते गोंदियाला जाणार असून तेथून परत आल्यावर दुपारी कन्हान येथे सभा घेणार असल्याचे कळवण्यात आले आहे. सभेची सर्व तयारी पूर्ण झाल्यानंतर अचानक शिंदेंच्या दौरा पुढे ढकलल्याने राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लावले जात आहे. पालकमंत्र्यांच्या नियुक्त्या, आमदारांच्या सुरक्षेत कपात व अन्य मुद्यांवरून सध्या भाजप व शिंदे गटात तणाव निर्माण झाला आहे. महायुतीत सर्वकाही सुरळीत आहे, असा दावा खुद्द शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना केला असला तरी या दोन्ही पक्षात समन्वयाचा अभाव असल्याचे चित्र सध्या राज्यात आहे. शिंदे सेनेच्या ‘ऑपरेशन टायगर’ ला प्रत्युत्तर म्हणून भाजपने शिवसेनेचे कट्टर विरोधक मलिक्कार्जून रेड्डी यांना पक्षात पुन्हा प्रवेश दिला आहे. हा शिवसेनेला एक प्रकारे संदेश देण्याचा प्रयत्न मानला जातो. या पार्श्वभूमीवर शिंदेंचा उद्याचा दौरा एक दिवस पुढे ढकलणे हे महत्वाचे ठरते.