लोकसत्ता टीम
नागपूर : समाजात निरपेक्ष भावनेने काम कसे करावे, हे संघ परिवाराकडून आम्ही शिकलो आहे. लहानपणी संघ शाखेत जात होतो. त्यानंतर शिवसेनाप्रमुख हिंदूह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या शिकवणीतून आमच्यावर संस्कार झाले. संघ आणि बाळासाहेबांचे विचार सारखे होते त्यामुळे स्मृती मंदिर परिसर आमच्यासाठी प्रेरणास्थान असून या ठिकाणी आल्यावर उर्जा मिळत असल्याची प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्मृती मंदिर परिसराला भेट दिल्यानंतर ते प्रसार माध्यमांशी बोलत होते.
रेशीमबाग स्मृती मंदिर यापूर्वी देखील आलो आहे. संघ परिवाराशी माझा बालपणापासून संबंध आहे.संघाच्या शाखेत मी जात होतो त्यामुळे माझ्यावर संघाचे संस्कार झाले आहे. निरपेक्ष भावनेने काम कसे करावे हे प्रत्येकाने संघ परिवाराकडून शिकले पाहिजे. कुठलीही प्रसिद्धी आणि अपेक्षा न ठेवता संघाचे स्वयंसेवक काम करत आहे. आज देशभरामध्ये संघाच्या पाच लाख शाखा आहे. संघाला पुढील वर्षी शंभर पूर्ण होत आहे. एखादी संस्था सुरू करुन ती शंभर वर्ष या देशाची सेवा करते हे समाजासमोर मोठे उदाहरण आहे आणि आमच्यासाठी प्रेरणास्थान आहे. देशाच्या उभारणीमध्ये संघाचे योगदान नाकारता येणार नाही. संघाची शिकवण ही तोडणारी नाही तर जोडणारी आहे. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचा हिंदुत्वाचा विचार आणि त्यांची शिकवण पुढे नेत आम्ही काम करतो आहे.
आणखी वाचा-संघ पदाधिकाऱ्यांचे महायुतीच्या आमदारांना बौद्धिक, म्हणाले…
आमचे सरकार ८० टक्के समाजकारण आणि २० राजकारण करत आहे. अडीच वर्ष मी मुख्यमंत्री होतो आणि आता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहे याचा मला आनंद आहे. अडीच वर्ष केल्यामुळे जनतेने आम्हाला त्याची पोचपावती दिली आहे. कुठलाही स्वार्थीभाव न ठेवता आम्ही काम केले आहे. देवेंद्र फडणवीस हे सुद्धा स्वयंसेवक आहे. त्यामुळे राज्याचा मुख्यमंत्री स्वयंसेवक झाला आहे याचा आम्हाला आनंद आहे. शिवसेनेचे सर्व आमदार या ठिकाणी आले आहे. या ठिकाणी भेट दिल्यावर बळ व उर्जा मिळते. सर्व आमदार येथून प्रेरणा घेऊन पुढे काम करणार आहे असे शिंदे म्हणाले. अजित पवार का आले नाही असे विचारले असता शिंदे यांनी मात्र त्यावर बोलणे टाळले.