नागपूर : ज्या समाजाला स्वतःच्या दैदिप्यमान इतिहासाचा विसर पडतो. त्याला उत्तम भविष्य नसते. आपली प्राचीन सभ्यता व संस्काराला न विसरता वाटचाल असली पाहिजे. त्यामुळे नागपुरमध्ये गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर सार्वजनिक स्वरूपात नववर्ष साजरा करण्याच्या सुंदर सोहळ्याचे समाधान असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी येथे केले.
गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर नागपूर येथे लक्ष्मीनगर परिसरातील तात्या टोपे गणेश मंदिर येथून निघालेल्या शोभायात्रेत फडणवीस सहभागी झाले. या उत्सवात सहभागी झालेल्या नागरिकांना ते संबोधित करत होते. अभिनेत्री गिरिजा ओक, मृणाल देव, आयोजक माजी महापौर संदीप जोशी यांची उपस्थिती होती.
हेही वाचा >>> छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित १९ स्थळांची केंद्राकडून देखभाल, वाचा सविस्तर…
गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर अभिनव पद्धतीने हिंदू नववर्षाचा महोत्सव नागपुरात होत असल्याचा आनंद त्यांनी व्यक्त केला. श्रीरामाच्या जयघोषात, नूतन वर्षाचा हा उपक्रम स्त्युत्य असून उत्तरोत्तर यामध्ये भर पडत जावी, अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या. ३१ डिसेंबरच्या रात्री नववर्षाचा उत्सव साजरा करण्याला विरोध नाही. मात्र, तो कसा साजरा होतो हे सर्वांना माहिती आहे. तथापि, नववर्षाचा आनंद हा कसा मंगलमय वातावरणात साजरा करावा, याचा वस्तूपाठ या कार्यक्रमाने घालून दिला आहे. यावेळी अभिनेत्रीद्वय गिरिजा ओक, मृणाल देव यांनीही शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी महापौर संदीप जोशी यांनी केले.