नागपूर : महानिर्मितीच्या कोल वॉशरीजमधील नाकारलेल्या कोळशाच्या विक्रीत गैरप्रकार झाला असेल तर त्याची चौकशी केली जाईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री व ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत केली. त्याचप्रमाणे नागपुरातील रेती घोटाळय़ाची एसआयटीमार्फत चौकशी केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
‘लोकसत्ता’ने एका वृत्त मालिकेच्या माध्यमातून या प्रकरणाकडे शासनाचे लक्ष वेधले होते. त्यानंतर विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेदरम्यान गुरुवारी हा मुद्दा उपस्थित करीत चौकशीची मागणी केली होती. या चर्चेला उत्तर देताना फडणवीस म्हणाले, वॉशरीजच्या प्रकरणात महाविकास आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन उद्योगमंत्र्यांनी या प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती नेमली होती. त्यांनी त्यांच्या अहवालात केलेल्या शिफारसीप्रमाणेच वॉशरी सुरू केली. मात्र यात काही चूक असेल तर चौकशी केली जाईल. काही लोकांनी कोळसा रोखण्याचा इशारा दिला. यामुळे वीजनिर्मितीवर परिणाम होईल, त्यामुळे अशा गोष्टींना थारा दिला जाणार नाही. रेती घोटाळय़ाची एसआयटीच्या माध्यमातून चौकशी केली जाईल, असे त्यांनी जाहीर केले. चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता.