गेली दोन ते अडीच वर्षे आपल्याकडे मोतीबिंदू शस्त्रक्रिया फारश्या झाल्या नाही. त्यामुळे हे रुग्ण राज्यभरात वाढले आहे. परंतु आता सर्वत्र मोतीबिंदू अभियानातून झटपट शस्त्रक्रिया केल्या जाईल. त्यासाठी शासकीय, सामाजिक संस्था आणि खासगी रुग्णालयांची मदत घेतली जाईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणाविस यांनी केली. शुक्रवारी संध्याकाळी मधव नेत्रपेढीच्या कार्यक्रमात ते बोलत होते.
हेही वाचा >>> अमरावती : कापसावरील आयातकराबद्दल थेट पंतप्रधान मोदी यांना पत्र
याप्रसंगी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत उपस्थित होते. फडणवीस पुढे म्हणाले, आपल्याकडे मोतीबिंदूची समस्या मोठी आहे. २०१६-१७ दरम्यान नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. विकास महात्मे यांच्यासोबत एका प्रकल्पावर काम केले. त्यावेळी १४ लाख नागरिकांना मोतीबिंदू शस्त्रक्रियेची तातडीने गरज असून न केल्यास अंधत्वाचा धोका असल्याचे पुढे आले. त्यानंतर शासकीय, धर्मादाय रुग्णालय, खासगी रुग्णालयाच्या मदतीने मोतीबिंदू शस्त्रक्रिया अभियान राबवले. परंतु गेली अडीच वर्षे या शस्त्रक्रिया ठप्प राहिल्याने पुन्हा मोतीबिंदूचे रुग्ण वाढले. त्यामुळे शासन सगळ्यांना सोबत घेऊन राज्यभरात मोतीबिंदू अभियान राबवणार आहे. विद्यार्थ्यांचीही तपासणी वेळोवेळी केली जात असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.