लोकसत्ता टीम
अकोला : लाडकी बहीण योजना जाहीर झाली, तेव्हा ‘मविआ’ नेत्यांनी योजना फसवी असल्याची टीका केली होती. मात्र, त्यांच्या नाकावर टिच्चून अडीच कोटी लाडक्या बहिणींच्या खात्यात योजनेचे पैसे टाकले. ‘मविआ’तील सावत्र भाऊ योजना बंद करण्यासाठी खटाटोप करीत आहे, असा आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.
कारंजा येथे भाजपच्या उमेदवार सई डहाके यांच्या प्रचारार्थ शनिवारी आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी उमेदवारांसह महायुतीतील घटक पक्षांचे पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते. देवेंद्र फडणवीस यांनी योजनांचा पाढा वाचला.
कारंजा मतदारसंघात आल्यावर स्व. प्रकाश डहाके आणि स्व. राजेंद्र पाटणी यांचे स्मरण होते. दिवंगत आमदार राजेंद्र पाटणी यांच्या माध्यमातून कारंजामध्ये मोठ्या प्रमाणात विकास निधी दिला. त्यांचे पुत्र ज्ञायक यांची समजूत काढली होती. पुढे निश्चित संधी देऊ, यावेळेस सई डहाके यांच्या पाठीशी उभे राहण्यास सांगितले होते. मात्र, दुर्दैवाने त्यांनी दुसरा रस्ता निवडला. त्या रस्त्याने गेल्यावर कधीच भले होत नाही, असा टोला देवेंद्र फडणवीसांनी लगावला.
आणखी वाचा-नागपूर : महामेट्रोच्या दिव्याखाली अंधार; भुयारी मार्गात दिवसा काळोख, अधिकारी सुस्त
कारंजामध्ये महायुतीने विकास कामे केली आहेत. त्याचे श्रेय कुणीही घेऊ नये. वाशीम दुर्लक्षित राहिलेला जिल्हा होता. २०१४ नंतर वाशीम जिल्ह्याला विकासाच्या केंद्रस्थानी आणले. समृद्धी महामार्गामुळे वाशीम जिल्ह्याची औद्योगिक प्रगती होईल. तरुणाईच्या हाताला काम मिळण्यासाठी नवे उद्योग येतील. जिल्हा रस्ते व रेल्वे मार्गाने जोडल्या गेला. बंजारा समाजाची काशी अशी ओळख असलेल्या पोहरादेवीकडे अगोदरच्या ६० वर्षांच्या सरकारने कायम दुर्लक्ष केले. २०१४ मध्ये आपले सरकार आल्यानंतर १०० कोटी रुपये विकास कामासाठी दिले. आता पुन्हा महायुतीने ६०० कोटी विकासासाठी दिले.
आणखी वाचा-पोलीस ठाण्यात साप आणि पोलिसांची तारांबळ
आतापर्यंतच्या इतिहासात पोहरागडावर कुठलेच पंतप्रधान आले नव्हते. पंतप्रधान नरेंद्र मोदी पोहरादेवी येथे दाखल झाले. शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार पूर्ण शक्तीने उभे राहिले. आठ हजार कोटींचा पीक विमा शेतकऱ्यांना दिला. भावांतर योजनेंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात थेट पैसे देणार आहोत. यापुढे कधीही सोयाबीन व कापसाचा भाव हमीभावापेक्षा कमी झाला, तर कमी झालेले पैसे सरकार थेट शेतकऱ्यांच्या खात्यात टाकण्याचा निर्णय घेतला आहे. वीज बिल शुन्य करण्याचा निर्णय देखील सरकारने घेतला. मागेल त्याला सौरपंप शेतकऱ्यांना दिला जात आहे. शेतकऱ्यांना दिवसा वीज दिली जात आहे, असे फडणवीसांनी सांगितले.
माजी नगराध्यक्ष हेडा भाजपमध्ये दाखल
वाशीम नगर पालिकेचे शिवसेनेचे माजी नगराध्यक्ष अशोक हेडा यांनी कारंजा येथे देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. गेल्या काही दिवसांपासून ते राजकारणापासून दूर होते.