अकोला : भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते, आमदार तथा माजी राज्यमंत्री गोवर्धन शर्मा यांचे कर्करोगाच्या आजाराने शुक्रवारी रात्री अकोल्यात निधन झाले. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी सकाळी आमदार गोवर्धन शर्मा यांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेऊन श्रद्धांजली अर्पण केली. “लोकांच्या दु:खात कायम आणि हक्काचा मदतीचा हात अशीच त्यांची ख्याती होती. त्यांच्या निधनाने मी माझा ज्येष्ठ सहकारी आणि एक पक्षनिष्ठ, ध्येयवादी नेता गमावला आहे”, अशा शब्दात देवेंद्र फडणवीस यांनी शोकसंवेदना व्यक्त केली.
अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघातून आमदार गोवर्धन शर्मा यांनी सलग सहा वेळा विजय मिळवला होता. सामाजिक क्षेत्रामध्ये सातत्याने ते कार्यरत होते. गोवर्धन शर्मा यांना गेल्या काही दिवसांपासून कर्करोगाने ग्रासले होते. शुक्रवारी रात्री त्यांची प्रकृती चिंताजनक होऊन वयाच्या ७४ व्या वर्षांत निधन झाले.
हेही वाचा – नागपूर : सावधान ! ‘ग्रीन क्रॅकर्स’च्या नावाखाली होऊ शकते फसवणूक
हेही वाचा – गोंदियाच्या बिरसी विमानतळावरून इंडिगो विमानाचे तिकीट बुकिंग सुरू; नागरिकांमध्ये उत्साह
आमदार गोवर्धन शर्मा यांच्या निधनामुळे राजकीय, सामाजिक व धार्मिक क्षेत्रात शोककळा पसरली आहे. आज सकाळपासून त्यांचे पार्थिव अंतिम दर्शनासाठी आळशी प्लॉट येथील त्यांच्या निवासस्थानी ठेवण्यात आले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या अंजली आंबेडकर यांच्यासह अनेक मान्यवरांनी त्यांचे अंतिम दर्शन घेतले. आपल्या लाडक्या नेत्याला निरोप देण्यासाठी प्रचंड गर्दी उसळली आहे.