यवतमाळ : नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत राज्यातील जनतेने महायुतीला भरभरून मते देत सत्तेत बसविले. याबाबतची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शिवसेनेचे मुख्यनेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे राज्यात आभार दौऱ्यानिमित्त जनतेशी संवाद साधत आहेत. येत्या गुरुवार, ३ एप्रिलला ते यवतमाळ येथे येणार आहेत, अशी माहिती राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी दिली.
स्थानिक विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत आज सोमवारी ते बोलत होते. स्थानिक समता मैदाना (पोस्टल ग्राऊंड) येथे दुपारी ४ वाजता या आभार दौऱ्यानिमित्त जाहीर सभा होणार आहे. या सभेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जिल्हाभरातून आलेल्या जनतेशी संवाद साधतील, असे संजय राठोड यांनी सांगितले. या कार्यक्रमास शिवसेनेचे सरकारमधील सर्व मंत्री उपस्थित राहणार आहेत. सामान्य कार्यकर्ता म्हणून मुख्यमंत्रिपदी विराजमान झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी लोकहिताचे असंख्य निर्णय घेवून महाराष्ट्राचा देशभर गौरव वाढविला. त्यांच्या कार्यकाळात ५०० च्या वर शासन निर्णय झाले. जवळपास १८ विविध महामंडळांची स्थापना झाली. ही सर्व कामे ऐतिहासिक ठरली. राज्यात महायुतीचे सरकार बहुमतात आल्यानंतर मतदारांचे आभार मानायला त्यांच्या घरापर्यंत येईल, असा शब्द त्यांनी दिला होता. महायुतीस निवडणुकीत मिळालेला विजय हा जनतेचा आहे. त्यामुळे मतदारांप्रती कृतज्ञता व्यक्त करून त्यांचे आभार मानण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्यभर आभार दौरा करत आहेत. त्या अंतर्गत गुरूवारी यवतमाळ येथे होणाऱ्या सभेत ते जनतेशी संवाद साधतील, अशी माहिती मंत्री संजय राठोड यांनी दिली.
या कार्यक्रमात अनेक महत्त्वाच्या राजकीय व्यक्तींचा शिवसेनेत प्रवेश होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने महायुतीतील तिन्ही पक्षांनी संघटनात्मक बांधणीवर भर दिला आहे, याच अर्थ तिन्ही पक्ष स्वतंत्र निवडणूक लढतील, असा होत नाही, असेही मंत्री संजय राठोड म्हणाले. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल बोलताना, सरकारने कर्जमाफी नाकारली नाही. शेतकऱ्यांसाठी अल्प आणि दीर्घकालीन उपाययोजना राबविणे सुरूच आहेत. वचननाम्यात दिलेले प्रत्येक वचन महायुतीचे सरकार पूर्ण करेल, असे मंत्री संजय राठोड यांनी यावेळी सांगितले. पत्रकार परिषदेस शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख हरिहर लिंगनवार, जिल्हा प्रमुख श्रीधर मोहोड, माजी जिल्हा प्रमुख पराग पिंगळे आदी उपस्थित होते.