लोकसत्ता कार्यालयाला सदिच्छा भेट

नागपूर : सध्याची युवा पिढी ड्रग्स, गांजा आणि हुक्क्यासारख्या अंमली पदार्थांच्या नशेसाठी आपले आयुष्य उद्ध्वस्त करीत आहे. हा व्यसनाचा भस्मासूर आता तर शाळकरी मुला-मुलींपर्यंतही पोहचू पाहत आहे. हे चित्र बदलण्यासाठी या व्यवसायात गुंतलेल्या गुन्हेगारांच्या टोळ्या संपवून शहर अंमली पदार्थमुक्त करू, असा संकल्प गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त आयपीएस मुमक्का सुदर्शन यांनी व्यक्त केला. ‘लोकसत्ता’ कार्यालयाला दिलेल्या सदिच्छा भेटीदरम्यान ते बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सुदर्शन म्हणाले, नागपुरात ड्रग्स, गांजा किंवा अंमली पदार्थांची निर्मिती होत नाही. परंतु, मुंबई, गोवा व अन्य राज्यातून तस्करी करून ते नागपुरात आणले जाते. त्यात नागपूर पोलिसांनी ‘ड्रग्स फ्री नागपूर सिटी’ अभियानाला सुरुवात केली असून येत्या काही दिवसांतच नागपुरातील अंमली पदार्थ तस्करांच्या टोळ्या गजाआड होतील. नागपुरात एकही हुक्का पार्लर सुरू राहणार नाही तसेच गांजा विक्रीला अजिबात थारा दिला जाणार नाही. गुन्हे शाखेने नुकताच १२०० किलो गांजा जाळून नष्ट केला व तब्बल २०० आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल केले. ३०० आरोपींवर गुन्हे शाखा लक्ष ठेवून आहे. प्रत्येक पोलीस ठाण्यात “नार्को कॉप्स” पथक तयार करण्यात आले असून अंमली पदार्थ विकले जाणाऱ्या ठिकाणांची यादी केली जात आहे.

प्रतिबंधात्मक कारवाईत नागपूर राज्यात पहिले

आधी नागपुरात गुन्हेगारांच्या टोळ्या कार्यरत होत्या. मात्र, पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या आक्रमक भूमिकेमुळे गुन्हे शाखेने गुंडांवर कारवाई केली. टोळीतील सदस्यांना मध्यवर्ती कारागृहात डांबले. एमपीडीए, मकोका आणि प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात नागपूर पोलीस राज्यात पहिल्या क्रमांकावर आहे.

बालगुन्हेगारी रोखण्याचे आव्हान

सध्या बालगुन्हेगारी ही पोलिसांसमोरील मोठे आव्हान आहे. अल्पवयीन मुले गुन्हेगारीकडे वळू नये म्हणून गुन्हे शाखेच्या पथकांकडून प्रयत्न केले जात आहेत. बालगुन्हेगारांसाठी आयुक्तालयाने ‘केअर’ नावाचे अभियान सुरू केले आहे. तेथे कोवळ्या मनावर पोलीस आणि सामाजिक संस्थांच्यावतीने चांगले संस्कार केले जात आहेत.

महिला सुरक्षेला प्राधान्य

राज्यात मुली-महिला बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढले असले तरी नागपूर पोलिसांच्या गुन्हे शाखेने सर्वाधिक बेपत्ता मुलींचा शोध घेतला आहे. बलात्कार, छेडखानी, विनयभंग, शेरेबाजी आणि मुलींना त्रास देणाऱ्यांना दामिनी पथक धडा शिकवत आहे. फुटाळा, अंबाझरी तलावासह उद्यानातसुद्धा दामिनी पथक गस्त घालते. मुली-महिलांसाठी भयमुक्त नागपूर करण्यासाठी पोलीस प्रयत्न करीत आहेत.

एएचटीयू-भरोसाचे यश

गुन्हे शाखेची शाखा म्हणून एएचटीयू आणि भरोसा सेल नागपुरात कार्यरत आहेत. एएचटीयूने राज्यात बाळ विक्री करणाऱ्या सर्वाधिक ५९ आरोपींना अटक केली. १६ नवजात बाळांना कुटुंबीयांच्या ताब्यात दिले. राज्यातील पहिला मकोका नागपुरात लावण्यात आला. भरोसा सेलने सामाजिक बांधिलकी जपून घरगुती वाद, कौटुंबिक वाद, ज्येष्ठ नागरिकांना सेवा, अनैतिक संबंध, प्रेमसंबंधातून होणारे गुन्हे यावर अंकुश मिळवला. अनेक संसाराची विस्कटलेली घडी पुन्हा बसवून दिली.

सडकी सुपारी, शासकीय धान्य, सुगंधित तंबाखू, गो-तस्कर आणि ड्रग्स तस्करांवर गुन्हे शाखेचे लक्ष आहे. कोणत्याही पद्धतीची तस्करी नागपुरात चालणार नाही. सुपारी आणि धान्य तस्करीवर कारवाई करण्यात येत आहे. तसेच सेक्स रॅकेटशी संंबंधित आरोपींवरही कारवाई सुरू आहे. गुन्हेगारमुक्त आणि गुन्हेगारीमुक्त शहर निर्माण करण्यास पोलीस कटिबद्ध आहेत, असेही मुमक्का सुदर्शन यांनी सांगितले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Deputy commissioner of police mumakka sudarshan resolved to make the city drug free by ending criminal gangs adk 83 amy
Show comments