बुलढाणा : समृद्धी महामार्गावरील २५ प्रवाशांचा बळी घेणाऱ्या अपघातानंतर परिवहन विभाग कमालीचा सक्रिय झाल्याचे चित्र आहे. आज, बुधवारी झालेल्या संयुक्त बैठकीत उपप्रादेशिक परिवहन अधिकारी प्रसाद गाजरे यांनी प्रवाशांच्या सुरक्षितेत हलगर्जीपणा कराल तर कारवाईला समोर जाल, असा सज्जड दमच दिला.
विभागाच्या येथील कार्यालयात आज ५ जुलैला खासगी लक्झरी बस चालक-मालकांची बैठक पार पडली. या बैठकीला जिल्ह्यातील ३० ट्रॅव्हल्स मालक व चालक हजर होते. बैठकीमध्ये प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून खासगी लक्झरी बस चालक-मालकांना सूचना देण्यात आल्या. प्रवासी बसमध्ये एन्ट्री करताच बसमधील सोयी सुविधांची आणि सुरक्षा संदर्भातील उपकरणांची त्यांना माहिती देण्यात यावी. चालकांनी मद्यपान करून बस चालवू नये, चालकाच्या केबिनमध्ये प्रवासी बसवू नये, अवैध प्रवासी वाहतूक करू नये, अशा सूचना त्यांनी दिल्या.
प्रवाशांची यादी परिपूर्णच हवी
समृद्धी महामार्गावरील अपघातात प्रवाशांच्या अपुऱ्या याद्या चिंता व अडचणींचा विषय ठरल्या होत्या. त्यामुळे प्रवाशांची अद्ययावत व नाव पत्यासह परिपूर्ण यादी तयार करावी, अशी ताकीद गाजरे यांनी यावेळी दिली. या सूचनांचे काटेकोर पालन न करणाऱ्या बसचालक आणि मालकांवर कारवाई करण्याचा इशारा यावेळी उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी दिला.