यवतमाळ : भूखंडाच्या मिळकत पत्रिकेचा फेरफार घेण्यासाठी १० हजार रुपयांची लाच स्वीकारतांना येथील भूमी अभिलेख कार्यालयातील उपअधीक्षक लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला. विजय राठोड, असे आरोपी लोकसेवकाचे नाव आहे. विशेष म्हणजे, या कारवाईनंतर कार्यालयाच्या परिसरात फटाके फुटले.
तक्रारदाराने १८ एप्रिल रोजी त्यांच्या जावयांच्या प्लॉटच्या मिळकत आखीव पत्रिकेमध्ये समाविष्ट करन फेरफार घेण्यासाठी येथील भूमी अभिलेख विभागातील उपअधीक्षक विजय राठोड, हे १० हजार रुपयांची लाचेची मागणी करीत असल्याबाबत सविस्तर तक्रार दिली होती. या तक्रारीवरून करण्यात आलेल्या पडताळणी कार्यवाही दरम्यान विजय राठोड यांनी पंचासमक्ष लाचेची मागणी करून स्वीकारण्याची तयारी दर्शविल्याचे निष्पन्न झाले. अमरावती येथील लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने आज बुधवारी भूमी अभिलेख विभागात सापळा रचून विजय राठोड यांना त्यांच्या कक्षात तक्रारदाराकडून १० हजार रुपये लाचेची रक्कम स्वीकारताच त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याविरुध्द पोलीस ठाणे अवधूत वाडी येथे गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरु आहे.
हेही वाचा >>>वाशीम: शेतकऱ्यांनी व्यथा मांडायच्या तरी कुणासमोर?, पालकमंत्री राठोड वाशीम जिल्ह्यात फिरकलेच नाही
ही कारवाई अमरावती लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक अमोल कडू, योगेशकुमार दंदे, युवराज राठोड शैलेश कडू, आशिष जांभोळे सतिश किटुकले यांनी केली. या कारवाईनंतर स्थानिक लाच लुचपत विभागासमोर नागरिकांनी फटाके फोडून आनंद व्यक्त केला.