नागपूर: नागपूर नगरीची स्थापना करणाऱ्या गोंड राजे बख्त बुलंदशहा यांच्या वंशजांना नागपुरात जागेसाठी वणवण फिरावे लागत आहे. आधी त्यांना जागा दिली आणि सर्व प्रक्रिया पूर्ण झाली असताना त्यांच्याकडून ही जागा हिरावून घेण्यात आली.
आदिवासींचे कला जीवन, सांस्कृतिक जतन व संवर्धन, बोलीभाषा संवर्धन, जीवनमान, पेहराव, प्रथा परंपरा, चालीरिती, संशोधन इत्यादी करीता आंतरराष्ट्रीय दर्जाचे गोंडवाना सांस्कृतिक संग्रहालय उभारण्यासाठी शासनाने सन २००२ ला मान्यता दिली. केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमाने हे संग्रहालय उभारण्यात येणार होते. केंद्र सरकारकडून संग्रहालय बांधण्यासाठी सन २००२ ला २१ कोटीचा निधी प्राप्त झाला होता. आदिवासी विकास विभागाने सुरवातीला संग्रहालय करीता राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, अंबाझरी रोड येथील जागा निश्चित केली. तेथे संरक्षक भिंतीचे बांधकाम केले.
हेही वाचा… मरावे परी कीर्तिरुपी उरावे! मेंदूमृत तरुणाच्या अवयवदानातून तिघांना नवजीवन
मोठ्या प्रमाणात निधीचा अपव्यय केला. विद्यापीठाने कोर्टातून आपली जागा परत मिळविली. नंतर मौजा चिखली येथील जागा, अपर आयुक्त निवास, सिव्हिल लाइन्स नागपूर येथील जागा, शासकीय दुध योजना परिसर, सिव्हिल लाइन्स नागपूर येथील जागा, गोरेवाडा येथील जागा असा जागेचा शोध तब्बल १६ वर्ष सुरू होता. आदिवासी समाज संघटनांनी सातत्याने पाठपुरावा केला तेव्हा २०१८ रोजी सुराबर्डी, अमरावती रोड नागपूर येथे पहिल्या टप्प्यात १२ एकर जागा आदिवासी विकास विभागाला मिळाली.
हेही वाचा… वनविभाग भरती : अख्खे परीक्षा केंद्रच मॅनेज, १५ लाखांचा दर, पेपरफुटीचे नागपूर कनेक्शन
अनेक मंत्री, सरकार बदलत गेले मात्र सुराबर्डी येथील जागेचे भूमिपूजन करण्यासाठी कोणत्याही लोकप्रतिनिधीला वेळ मिळाला नाही. यासाठी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद सह अन्य सामाजिक संघटना यांनी वारंवार शासनाकडे निवेदन द्वारे मागणी केली मात्र आदिवासी समाजाप्रती नेहमीप्रमाणे शासन उदासीन राहिले. सुराबर्डी येथे संरक्षण भिंत बांधण्यासाठी सुध्दा कोट्यवधी निधीचा दुरुपयोग झाला. आता २१ वर्षाच्या दीर्घ प्रवासानंतर आदिवासी विकास विभागाने २७ जुलैला पत्र काढून गोंडवाना सांस्कृतीक केंद्र व प्रशिक्षण उपकेंद्र सुराबर्डी, नागपूर एवजी मौजा चारगाव ता. पारशीवणी येथे उभारण्याचा निर्णय घेतला असे जाहीर केले. शासनाच्या या निर्णयामुळे आदिवासी समाज नाराज असून नागपूर नगरीची स्थापना करणाऱ्या गोंड राजे बख्त बुलदंशहा यांच्या वंशजांना नागपुरात जागा मिळू नये यावर आश्चर्य व्यक्त केले आहे.