बुलढाणा : खामगाव नजीकच्या घाटपुरी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त लावलेल्या शुभेच्छा फलकावर चिखल फेकल्याचे निदर्शनास आले. यामुळे संतप्त अनुयायी रस्त्यावर उतरले असून घाटपुरीसह खामगाव परिसरात तणाव निर्माण झाला आहे.
घाटपुरी गावात भीम जयंती निमित्त लागलेल्या पोस्टरवर अज्ञातव्यक्तीद्वारे चिखलफेक करण्यात आल्याचे आज शुक्रवारी सकाळी निदर्शनास आले. ही माहिती वाऱ्यासारखी पसरताच आंबेडकरी चळवळीतील संतप्त अनुयायी व समाज बांधव रस्त्यावर उतरले. यामध्ये महिलांचाही सहभाग आहे.
सकाळी दहा वाजेपर्यंत हा अघोषित रास्ता रोको सुरू होता. हे कृत्य करून सामाजिक वातावरण कलुषित करणाऱ्या अज्ञात इसमास अटक करण्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे.