नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे ( शरद पवार) नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आमदार असताना मतदारसंघात मंजूर करवून घेतलेली विकास कामे भाजपचे विद्यमान आमदार चरणसिंह ठाकूर यांनी थांबवल्याने देशमुख विरुद्ध ठाकूर समोरासमोर आले आहेत. या विरोधात अनिल देशमुख यांचे पुत्र सलील देशमुख यांनी नागपूर जिल्हा परिषदेसमोर ठिय्या आंदोलन केले.

काटोल विधानसभा मतदारसंघ अनिल देशमुख यांचा बालेकिल्ला समजला जात होता. परंतु २०२४ च्या विधानसभेत हा किल्ला ढासळला. भाजपचे चरणसिंह ठाकूर यांनी अनिल देशमुख यांचे सुपुत्र सलील देशमुख यांचा पराभव केला. निवडून आल्यानंतर ठाकूर यांनी अनिल देशमुख यांच्या कार्यकाळात मंजूर विकास कामे रद्द करण्याची मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली. त्यामुळे सलील देशमुख यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे.चरणसिंह ठाकूर यांनी जिल्हाधिकारी, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सचिव यांना पत्र लिहून काटोल विधानसभा मतदारसंघातील मंजूर कामे रद्द करण्याची मागणी केली आहे.अनिल देशमुख यांच्या कार्यकाळात पंतप्रधान खनिज क्षेत्र कल्याण योजनेअंतर्गत सुमारे २० कोटींची कामे मंजूर करण्यात आली होती. त्यासाठी निधी वितरणाचे आदेशही देण्यात आले होते.परंतु काटोलचे आमदार बदलाच ही कामे रद्द करण्याच्या हालचाली सुरू झाल्या. तसे पत्र जिल्हा परिषद बांधकाम विभागाला देण्यात आले. त्यावर या विभागाने आमदारांच्या पत्रावर नेमके काय करावे, यावर मार्गदर्शन करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिले. या पत्राची माहिती मिळताच देशमुखांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानुसार जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सलील देशमुख यांनी मंगळवारी जिल्हा परिषदेसमोर ठिय्या आंदोलन केले. मतदारसंघातील मंजूर कामे रद्द करून काय साध्य करणार, अशाप्रकारचे राजकारण योग्य नाही. ही कामे थांबल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा सलील देशमुख यांनी दिला.

अनिल देशमुख यांनी काटोल विधानसभा मतदारसंघाचे सुमारे पंचवीस वर्षे प्रतिनिधित्व केले. अनिल देशमउख यांनी २०१४ च्या विधानसा निवडणुकीत त्यांचे पुतणे आशिष देशमुख यांनी पराभूत केले होते. ते वगळता अनिल देशमुख सलग निवडून आले होते. ते राज्याचे गृहमंत्री राहिले आणि त्यांनी मतदासंघासाठी विकास निधी खेचून आणला. पण, महाविकास आघाडी सरकारमध्ये गृहमंत्री असताना त्यांच्यावर तत्कालिन पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी आरोप केले. त्यानंतर अतिशय वेगवान राजकीय घडामोडी घडल्या आणि त्यांना तुरुंगात जावे लागले होते. त्यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होते. देशमुख यांनी या तुरुंगावासाठी विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जबाबदार धरले होते. त्यासंदर्भात त्यांनी एक पुस्तक देखील लिहले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाने त्यांना २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत काटोलची उमेदवारी घोषित केली होती. परंतु ऐनवेळी अनिल देशमुख यांनी सुपुत्र सलील देशमुख यांना निवडणूक रिंगणात उतरवले होते. येथे भाजपने बाजी मारली. आता विकास कामांच्या प्रश्नावर देशमुख विरुद्ध ठाकूर असा सामना रंगताना दिसून येत आहे.

Story img Loader