व्यवस्था दुरुस्तीकडे महापालिकेचे दुर्लक्ष
राम भाकरे
नागपूर : कचरा उचलणाऱ्या कंपन्या व महापालिका यांच्यातील वादात संपूर्ण शहर कचरा घर होत आहे की काय, असे चित्र अलीकडच्या काळात निर्माण होत आहे. महापालिकेने संकलन केद्रांची संख्या वाढवली पण कचराच उचलला जात नसल्याने शहरातील कचरा ढिगाऱ्यांची संख्या कमी होताना दिसत नाही.
कचरा संकलन खासगी क्षेत्राकडे सोपवल्यापासून या शहराच्या स्वच्छतेची लयाच गेली. कंपन्या, महापालिकेचे अधिकारी, पदाधिकारी व नगरसेवकांच्या हातमिळवणीतून निर्माण होणाऱ्या भ्रष्ट वर्तुळातून कोटय़वधी रुपये कंपन्यांच्या घशात घालूनही शहर कचरा मुक्त करण्यात महापालिकेला अद्यापही यश आले नाही. सध्या शहरात एव्हीजी व बीव्हीजी या दोन कंपन्याकडे २०१८ मध्ये कचरा संकलन करण्याचे काम देण्यात आल्यानंतर शहरातील विविध भागातील कचऱ्याच्या घराची संख्या कमी होईल आणि शहर स्वच्छ राहील असे नागरिकांना अपेक्षा होती. मात्र कंपन्यांच्या कामात सातत्य नसल्याने व त्यांच्यावर महापालिकेचे नियंत्रण नसल्याने संकलनात विस्कळीतपणा आला आहे. आता तर त्यांचे कंत्राटच रद्द केले जाणार आहे. चार वर्षांत कचरा संकलन केंद्राच्या संख्येत वाढ केली. तरीही प्रश्न सुटलेला नाही. एकीकडे सिमेंट रस्ते तयार करून परिसर सुशोभित केला जात असताना रस्त्याच्या बाजूला कचऱ्याचे ढीग साचलेले दिसत आहे. ७०० पेक्षा अधिक नवे कचराघर शहरात निर्माण झाल्याचे महापालिकेच्या स्वच्छ सर्वेक्षणात समोर आले आहे. सर्वाधिक नेहरूनगर, लकडगंज, धरमपेठ, धंतोली, आशीनगर व मंगळवारी झोनअंतर्गत आहे. एव्हीजी व बीव्हीजी या दोन्ही कंपनीकडे पाच पाच झोन देण्यात आले आहे. करारामध्ये झोनमधील कचराघराची संख्या कमी व्हावी यासाठी नियोजन करण्यासंबंधी आदेश होते, मात्र गेल्या तीन वर्षांत कंपनीकडून त्याचे पालन झाले नाही.
आठवडी बाजारही कचऱ्यातच
शहरातील बुधवार बाजार, सक्करदरा बाजार, मंगळवारी बाजार, मानेवाडा, सोमवारी क्वार्टर, इंदोरा, इतवारी निकालस मंदिर, खामला, पांडे लेआऊट, वर्धमाननगर, वाठोडा आदी भागात बाजारात नियिमत कचरा उचलला जात नाही.
का साचतो कचरा?
नागरिकांच्या घरातून नियमित कचऱ्याची उचल केली जात नाही. त्यामुळे आठ-आठ दिवस कचरा पडून राहतो. लोक घराच्या आसपास मोकळय़ा भूखंडावर कचरा जमा करतात आणि काही दिवसात तेथे ढीग तयार होतो.
नंदनवन परिसरात मंदिराच्या शेजारीच कचरा टाकला जातो. तक्रार केली तरी तेथील कचरा उचलला जात नाही.
– नामदेव सेलोकर, नेहरूनगर
शहरातील सर्व प्रभागांमध्ये कचरा साठण्यासाठी केंद्र आहे. तेथील कचरा उचलला जात नसेल किंवा केंद्राव्यतिरिक्त इतर ठिकाणी कचरा टाकला जात असेल तर याबाबत कारवाई करण्यात येईल.
– गजेंद्र महल्ले, आरोग्य अधिकारी (घनकचरा) महापालिका