नागपूर : शासनाने घोषणा केल्यावरही स्मार्ट प्रीपेड मीटर छुप्या पद्धतीने ग्राहकांकडे लागत आहे. या मीटरमध्ये स्वयंचलीत पद्धतीने मीटर वाचन होत असल्याने राज्यातील हजारो कंत्राटी मीटर वाचन करणारे कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीचे संकट आहे. हे कर्मचारी शनिवारी सकाळपासून संपावर गेले आहे. त्यामुळे यंदा महावितरणच्या वीज देयक, वितरण, वसूलीचे काम विस्कळीत होण्याचा धोका आहे. या आंदोलनाबाबत आपण जाणून घेऊ या.
महाराष्ट्रात स्मार्ट प्रीपेड मीटर लावण्याचा घाट रचला जात आहे. त्यामुळे राज्यभरातील मीटर वाचन करणाऱ्या कंत्राटी कामगारांवर बेरोजगारीचे संकट घोंगावत असून या कामगारांनी आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी १ फेब्रुवारीपासून राज्यात बेमुदत काम बंद सुरू केले आहे. त्यानुसार हे कर्मचारी राज्यभरातील महावितरणच्या झोन, सर्कल कार्यालय परिसरात एकत्र आले आहे. ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांचे गृह शहर असलेल्या नागपुरातील संविधान चौकातही हे आंदोलन सुरू झाले आहे.
एम. एस. ई. डी. सी. एल. मीटर रिडर कंत्राटी कामगार संघटनेच्या नेतृत्वात हे आंदोलन सुरू आहे. लोकसत्ताशी बोलतांना संघटनेचे अध्यक्ष रमेश जांगळे म्हणाले, आम्ही मीटर वाचक म्हणून मागील २५ वर्षांपासून काम करत आहोत. स्मार्ट प्रीपेड मीटरमुळे आमचा रोजगार हिरावणार आहे. त्यामुळे या मीटरला आमचा विरोध आहे. आम्ही सातत्याने महावितरणसह शासनाकडे आम्हाला वयाच्या ६० व्या वर्षापर्यंत शाश्वत रोजगाराची हमी, शासनाचे सर्व भत्ते, कंत्राटदाररहित नोकरी आणि इतर मागण्यांसाठी आंदोलन करत आहोत. हिवाळी अधिवेशनातही मंत्री अतुल सावे यांनी आमचा प्रश्न सोडवण्यासाटी लवकरच संबंधित मंत्री व अधिकाऱ्यांसोबत बैठकीचे आश्वासन दिले होते. परंतु बैठकीसाठी सरकारकडून साधी वेळही दिली जात नाही. त्यामुळे आमची शासनाकडून थट्टा सुरू आहे. शासनाकडून न्याय मिळत नसल्यने शेवटी नाईलाजाने १ फेब्रुवारीपासून काम बंद करावे लागत आहे.
आंदोलनामुळे राज्यभरातील मीटर वाचनाचे काम थांबून वीज देयक वाटपासह महावितरणच्या वसुलीवरही परिणाम होण्याचा अंदाज जांगळे यांनी वर्तवला. परंतु या सगळ्याला शासनासह महावितरण जबाबदार राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले. शनिवारी पहिल्या दिवशी राज्यातील सुमारे २० जिल्ह्यात आंदोलनाला सर्वाधिक प्रतिसाद असून रविवारपासून इतरही जिल्ह्यातील आंदोलन पूर्ण क्षमतेने उतरणार असल्याचेही जांगळे यांनी सांगितले. दरम्यान राज्यात विविध कंत्राटदाराकडून महावितरणच्या वीज मीटर वाचनाचे काम करणारे सुमारे २० हजारावर कंत्राटी वीज मीटर वाचन करणारे कर्मचारी असल्याचा दावाही त्यांनी केला.