चंद्रपूर : राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा नवनियुक्त पालकमंत्री अशोक उईके यांच्या चंद्रपूर नगरीतील प्रथम आगमनानिमित्त आयोजित कार्यक्रम वादात अडकला आहे. त्याला कारण भाजपा आमदार किशोर जोरगेवार ठरले आहेत. शासनाच्या आदेशानुसार, प्रियदर्शनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृहात राजकीय पक्षांना कार्यक्रम घेण्यास सक्त मनाई आहे. तरीही आमदार जोरगेवार यांनी भाजपा कार्यकर्ता मेळावा व पालकमंत्री सत्कार कार्यक्रमाचे येथे आयोजन केले. ही बाब जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास येताच त्यांनी आक्षेप घेत रजकीय कार्यक्रम घेऊ नका, असे स्पष्ट सांगत सभागृह देण्यास नकार दिला. त्यामुळे ऐनवेळी आदिवासी संघटनाच्या माध्यमातून आता सत्कार सोहळा घेतला जात आहे. दरम्यान, आमदार जोरगेवार यांनी महानगर पदाधिकारी व माजी पालकमंत्र्यांना विश्वासात न घेतल्याने या कार्यक्रमावर बहिष्काराचे सावट आहे.
काय आहे प्रकरण?
राज्याचे आदिवासी विकास मंत्री प्रा.डॉ.अशोक उईके उद्या रविवार, २६ जानेवारीच्या ध्वजारोहण समारंभासाठी आज सायंकाळी चंद्रपुरात दाखल होत आहे. पालकमंत्री डॉ. उईके यांच्या प्रथम आगमनानिमित्त चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार यांनी भाजपा कार्यकर्ता मेळावा व पालकमंत्री सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या सत्कार सोहळ्याचे फलक शहरात सर्वत्र लागले आहेत. प्रियदर्शनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृहात हा कार्यक्रम आयोजिला आहे. मात्र या सभागृहात राजकीय कार्यक्रम घेण्यास शासनाच्याच आदेशानुसार मनाई आहे.
राजकीय कार्यक्रमाला बंदी
ही बाब जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या निदर्शनास आली. त्यांनी लगेच पक्ष कार्यकर्ता मेळावा हा राजकीय कार्यक्रम घेता येणार नाही असे आमदार जोरगेवार यांना सांगितले. पालकमंत्री सत्कार सोहळा हा एखाद्या संस्थेच्या माध्यमातून घेता येईल. तेव्हा भाजपाला सभागृह देता येणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे ऐनवेळी आमदार जोरगेवार यांच्यावर भाजपा कार्यकर्ता मेळावा रद्द करण्याची नामुष्की ओढवली. दुसरीकडे सत्कार सोहळ्यासाठी आदिवासी संघटनेच्या माध्यमातून सभागृह नोंदणीसाठी पत्र देण्यात आले आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी विनय गौडा यांना विचारले असता, राजकीय पक्षाला सभागृह देता येत नाही. त्यामुळे भाजपा कार्यकर्ता मेळाव्यासाठी सभागृह दिले नाही. आदिवासी संघटनेने सत्कार सोहळ्यासाठी पत्र दिले आहे. त्यामुळे पालकमंत्री सत्कार सोहळ्याला सभागृह देत असल्याचे सांगितले.
सुधीर मुनगंटीवार यांना विश्वासात घेतले नाही
कार्यकर्ता मेळाव्याच्या आयोजनासाठी माजी पालकमंत्री तथा भाजपाचे ज्येष्ठ नेते आमदार सुधीर मुनगंटीवार, शहराध्यक्ष राहुल पावडे यांना विश्वासात घेतले गेले नाही. त्यामुळे पावडे आणि पदाधिकारी या मेळाव्यावर बहिष्कार घालणार असल्याची माहिती आहे. पालकमंत्री उईके यांच्या शहरातील प्रथम आगमनानिमित्त आयोजित कार्यक्रम चांगलाच वादात अडकल्याचे चित्र आहे. आमदार जोरगेवार यांनी या कार्यक्रमाच्या तयारीसाठी बैठका घेतल्या. त्या बैठकांनाही शहराध्यक्ष तथा बहुसंख्य माजी नगरसेवक गैरहजर होते. यासंदर्भात अधिक माहितीसाठी आमदार जोरगेवार व शहराध्यक्ष राहुल पावडे यांच्याशी संपर्क साधला असता दोघांनीही प्रतिसाद दिला नाही.