गडचिरोली : भारतीय जनता पक्षाने नुकतीच जाहीर केलेल्या कार्यकारिणीमध्ये गडचिरोलीतील केवळ आठजणांची वर्णी लागल्याने कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. जिल्ह्यात दोन आमदार, एक खासदार असूनही शेजारच्या चंद्रपूर जिल्ह्याला अधिक झुकते माफ देण्यात आल्याने गडचिरोलीतील नेत्यांमध्ये असंतोष दिसून येत आहे.
गडचिरोली जिल्ह्यात एकेकाळी काँग्रेसचे असलेले वर्चस्व मोडून काढत भाजपाने दहा वर्षांत दमदार कामगिरी केली आहे. त्याच बळावर जिल्ह्यातील आरमोरी, गडचिरोली विधानसभा आणि लोकसभा निर्विवाद जिंकून आणल्या. स्थानिक स्वराज्य संस्थेतसुद्धा मोठे यश संपादन केले. नुकत्याच झालेल्या बाजार समितीच्या निवडणुकीतदेखील एकतर्फा विजय मिळवला. मात्र, प्रदेश कार्यकारिणीमध्ये केवळ आठजणांची वर्णी लागल्याने कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.
हेही वाचा – वर्धा : लग्न मुहूर्तांचा खोळंबा संपला; मे-जूनमध्ये मुहूर्तच-मुहूर्त, पालकांची लगबग सुरू
जिल्ह्यातील अरविंद पोरेड्डीवार, माजी मंत्री अम्ब्रीश आत्राम आणि रवी ओल्लालवार यांना विशेष निमंत्रित सदस्य म्हणून स्थान देण्यात आले. तर कार्यकारणी सदस्यपदी बाबुराव कोहळे आणि राजेंद्र गांधी यांची वर्णी लागली. तर निमंत्रित सदस्य म्हणून तिघांना संधी देण्यात आली. प्रदेश पदाधिकाऱ्यांमध्ये एकाही नेत्याला घेण्यात आले नाही. तुलनेने शेजारील चंद्रपूर जिल्ह्यातील तब्बल २५ जणांना संधी देण्यात आली आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.