चंद्रपूर : शिक्षक आमदार सुधाकर अडबाले यांच्या पत्रानंतरही ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांची अधिकचे शुल्क आकारून फसवणूक झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. आधीच ताडोबातील ऑनलाईन तिकीट विक्री घोटाळ्याची ईडी कडून चौकशी सुरु असताना पुन्हा फसवणुकीचा प्रकार समोर आल्याने ताडोबा व्यवस्थापनात खळबळ उडाली आहे.
जगप्रसिद्ध ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात सध्या पर्यटकांची गर्दी आहे.
देशविदेशातून पर्यटक येथे वाघाला बघण्यासाठी येतात. अशात तिकीट विक्रीत अधिकचे पैसे उकळले जात असल्याच्या तक्रारी आहेत. मात्र आता तर अतिरिक्त शुल्क आकारून पर्यटकांची फसवणूक केल्याची घटना शुक्रवार ३१ जानेवारी रोजी उघडकीस आली. याप्रकरणी कारवाई करून अहवाल सादर करण्याचे निर्देश मुख्य वनसंरक्षक तथा ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक डॉ. जितेंद्र रामगावकर यांनी उपसंचालकांना (कोअर व बफर) दिले आहेत. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात पर्यटक व्ही. प्रभाकर यांच्याकडून क्रुझर बुकिंगसाठी ५०० रुपयांऐवजी एक हजार रुपये घेण्यात आले. शिवाय ११ व्यक्तींचे अतिरिक्त ५ हजार ५०० रुपये वसूल केले. यातील पाच पर्यटकांची नावे तिकिटात नसताना त्यांनाही प्रकल्पात प्रवेश देण्यात आला. दुसरे आणखी एक पर्यटक सचिन सलुजा यांच्याकडूनही अधिकचे शुल्क घेण्यात आले.
नऊ व्यक्तींकडून अतिरिक्त १ हजार ८०० रुपये घेतले. विशेष म्हणजे शिक्षक आमदार सुधाकर अडबाले यांनी ताडोबा व्यवस्थापनाला शिफारसपत्र दिले होते. आमदार अडबाले यांच्या पत्रानुसार, पर्यटकांसाठी दोन वाहनांची मागणी केली होती. मात्र, पर्यटकांकडून प्रतिसफारी ६ हजार ६०० रुपयेप्रमाणे दोघांकडून १३ हजार २०० रुपये ऐवजी २० हजार रुपये घेतले. याप्रकरणी क्रूझर बुकिंग ऑपरेटर शुभम चौधरी यांनी १६ जानेवारी २०२५ रोजी तक्रार दाखल केली. यात ताडोबाचे सौरभ ठोंबरे यांच्यावर ठपका ठेवण्यात आला. ठोंबरे यांनी ताडोबा व्यवस्थापनाकडे खुलासा सादर करावा अशी नोटीस बजावण्यात आली आहे.तसेच या प्रकरणी ताडोबा उपसंचालकांनी (कोअर व बफर) कारवाई करून अहवाल सादर करण्याच्या सूचना डॉ. रामगावकर यांनी दिल्या आहेत.