नागपूर : छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान करून इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना शिवीगाळ केल्याचा आरोप असलेला प्रशांत कोरटकर याने नागपुरातील प्रसारमाध्यमांसमोर येऊन आपली भूमिका मांडली. मात्र, पोलिसांनी घराला सुरक्षा दिली असताना कोरटकर नागपुरातून पसार झालाच कसा, असा प्रश्न आता निर्माण झाला आहे.
कोल्हापूर पोलिसांनी कोरटकर याच्यावर गुन्हा दाखल केला. हे वृत्त कळताच कोरटकरने नागपुरातील प्रसारमाध्यमांसमोर आपली भूमिका मांडली. माझा आवाज मॉर्फ करण्यात आला आहे. मी इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना फोन केलाच नाही. कुणीतरी माझ्या नावाचा गैरवापर करुन खोडसाळपणा केला आहे, असे मत त्याने प्रसारमाध्यमासमोर मांडले. कोल्हापुरातील जुना राजवाडा पोलीस ठाण्यात प्रशांत कोरटकरविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल झाल्याने कोरटकर गंभीर स्वरुपाच्या गुन्ह्यातील आरोपी ठरतो. तरीही तो उजळमाथ्याने प्रसारमाध्यमांसमोर आपली भूमिका मांडत होता. त्यावेळी मात्र, नागपूर पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतली. तसेच त्याने सायबर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविणार असल्याचे सांगताच, त्यावर नागपूर पोलिसांनी लगेच विश्वास ठेवला. कोरटकर हा पळून जाणार नाही, असा अतिआत्मविश्वास नागपूर पोलिसांना भोवला. संपूर्ण राज्यातील सामाजिक परिस्थिती गढूळ करणाऱ्या प्रशांत कोरटकरने नागपूर पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पलायन केले.
कोल्हापूर पोलिसांचे कोतवालीत छापे
प्रशांत कोरटकर याच्याबाबत गोपनीय माहिती कोल्हापूर पोलिसांना मिळाली आहे. त्यामुळे पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे यांच्या पथकाने कोतवालीत छापे घातले. सध्या कोल्हापूर पोलिसांचे पथक कोतवाली परिसरात तपास करीत आहे.