सहा वर्षांपूर्वी नागपूर रेल्वेस्थानकावर बेवारस आढळलेल्या मूकबधिर मुलाचा त्याचे आधार कार्ड तयार करताना मूळ गाव व पालकांचा शोध लागल्याने सहा वर्षानंतर त्याच्या आईकडे सुपूर्द करण्यात आले. सोचनकुमार बलम यादव असे या मूकबधिर मुलाचे नाव आहे. तो सध्या शासकीय बालगृहात राहात होता. २०१६ मध्ये सोचनकुमार हा नागपूर रेल्वेस्थानकावर बेवारस अवस्थेत रेल्वे पोलिसांना सापडला होता. तो मूकबधिर आहे. त्याला एक वर्षाने शंकरनगर चौक येथील मूकबधिर विद्यालयात व नंतर १६ ऑक्टोबर २०१८ मध्ये हुडकेश्वर येथील मूकबधिर विद्यालयात स्थानांतरित करण्यात आले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सध्या तो मुलांचे शासकीय बालगृह (कनिष्ठ), पाटणकर चौक नागपूर येथे राहात होता. येथे बालकांचे आधार कार्ड तयार केले जात होते. मात्र सोचनकुमारचे कार्ड तयार होत नव्हते. त्यामुळे संस्थेने आधार कार्ड सेवा केंद्र मानकापूरचे प्रबंधक कॅप्टन अनिल मराठे यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी या मुलाचे आधार कार्ड यापूर्वी तयार केले असावे म्हणूनच नवीन तयार होत नाही, असे सांगितले. त्यामुळे हाताचे ठसे घेऊन नवीन आधार कार्ड तयार करण्याचे ठरले.

हेही वाचा : वर्धा : घरकुलाच्या नावाखाली श्रमिकांची फसवणूक

ही प्रक्रिया करताना मुलाचे नाव सोचनकुमार बलम यादव व पत्ता मछरा, ता. अलौली, जि. खगरिया (बिहार) ८४८२०३ असल्याची माहिती पुढे आली. संस्थेने तत्काळ बिहारमधील संबंधित पोलीस ठाण्याशी संपर्क साधून सोचनकुमारच्या पालकांचा शोध घेतला. पालक सापडल्यावर बाल कल्याण समिती नागपूर यांच्या आदेशाने सोचनकुमारला त्याची आई रंजुदेवी बलम यादव यांच्या ताब्यात देण्यात आले. सोचनकुमार ६ वर्षांनी त्याच्या कुटुंबात परतला.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Destitute deaf mute son returns to mother after six years in nagpur address detected by aadhaar card tmb 01