लोकसत्ता टीम

भंडारा: नवऱ्यासोबत भांडण झाले आणि रागाच्या भरात ती घर सोडून निघून गेली. राग अनावर होता, घरी परत जायचे नव्हते. अशातच या निराधार महिलेला हेरून एका महिलेने दिला आश्रय दिला. मात्र तो एक ट्रॅप होता. मोठी रक्कम घेऊन विकणाऱ्या टोळीच्या जाळ्यात ती नकळतपणे अडकली होती. मात्र या त्रयस्थांकडून आपली विक्री होत असल्याचे लक्षात येताच स्वतःच्या विक्रीचा हा डाव तिनेच मोठ्या शिताफिने हाणून पाडला. तिच्या हुशारीने दोन महिलांसह एकाला अटक करण्यात पोलिसांना यश आले. मोहाडी पोलिसांनी या मानवी तस्करी करणाऱ्या टोळीला गजाआड केले असून या तस्करीच्या साखळीतील अन्य दुवे शोधत आहेत.

सविस्तर वृत्त असे की, मोहाडी येथे राहणाऱ्या एका महिलेचे पतीसोबत भांडण झाले. रागाच्या भरात ९ जून रोजी ती घरून निघून गेली. तिची भेट मुळची मोहाडी व सध्या जवळच पारडी येथे राहणाऱ्या ममता राहुलकर, वय ४४ हिच्यासोबत झाली. ममताने विवाहितेची आपबीती ऐकून तिला दोन दिवस आपल्या घरी आश्रय दिला. त्यानंतर तिला हरी शेंडे, वय ५५ रा. पारडी याच्या स्वाधीन केले. हरी याने तिला फूस लावून ललिता दामले, वय ४०, खैरबोडी, ( ता. तिरोडा, जि. गोंदिया) हिच्या घरी नेऊन सोडले. १२ जून ते १९ जूनपर्यंत आठ दिवस ही विवाहिता तेथेच होती. दरम्यान ललिताच्या घरी आलेली अनोळखी व्यक्ती लाखो रुपयात आपला सौदा करीत असल्याचे विवाहितेच्या लक्षात येताच विवाहितेने पळून जाण्याचा प्रयत्न केला मात्र तिला कायम नजरकैदेत ठेवले जायचे. रात्री पळून जाऊ नये म्हणून गुंगीचे औषध दिले जात होते.

आणखी वाचा-विहिरीत आढळला आशा वर्करचा मृतदेह; पालोरा येथील घटना

या दरम्यान तिचे बनावट आधार कार्डसुद्धा तयार करण्यात आले. १९ जूनच्या रात्री सुमारे ११ वाजता विवाहितेने लपून छपून ललिताच्या मोबाइलवरून आपल्या पतीला कॉल लावून खोकलून इशारा दिला. पतीने खोकण्याचा आवाज ओळखून पोलिसांना लगेच माहिती दिली. पोलीसांनी लोकेशन ट्रेस करून रात्रीच ललिताला ताब्यात घेऊन मोहाडीत आणले. या प्रकरणात ममता राहुलकर, ललिता दामले व हरी शेंडे यांना अपहरण, मानव तस्करी, खोटे आधार कार्ड बनविणे, शिवीगाळ, धमकी या आरोपात कलम ३६५, ३६६, ३७०, ५११, ४६८, ५०४, ५०६, ३४ भादंविनुसार अटक केली. २६ जूनपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक लोहित मतानी, अधिकारी अशोक बागुल यांच्या मार्गदर्शनात, पोलीस निरीक्षक प्रदीप पुल्लरवार, पोलीस हवालदार पिंटू लांडगे हे अधिक तपास करीत आहेत.