गोंदिया : गेल्या तीन महिन्यापासून अनुदानाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या निराधारांसाठी आता गोड बातमी आली असून त्यांची दिवाळी ‘प्रकाशमय’ होणार आहे. दिवाळीच्या तोंडावर निराधारांना दिल्या जाणाऱ्या अनुदानात वाढ करण्यात आली आहे. दीड हजार रुपये प्रति महिना याप्रमाणे आता अनुदान मिळणार असून रखडलेले तीन महिन्यांचे एकत्र अनुदान देण्यात येणार आहे. सोबतच नोव्हेंबरचेही अनुदान मिळणार आहे.गोंदिया जिल्ह्यात संजय गांधी निराधार योजनेसह श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेचे १ लाख ४९ हजार ४१६ लाभार्थी आहे. त्यांच्या बँक खात्यामध्ये आठ ते दहा दिवसात ही रक्कम जमा केली जाणार असल्याची माहिती संजय गांधी योजना विभागाने दिली आहे.
जिल्ह्यातील तब्बल १ लाख ४० हजार ४१६ लाभार्थी निराधारांना लाभार्थ्यांना जूनपर्यंतचे अनुदान मिळाले आहे. गेल्या तीन महिन्यापासून हे अनुदान रखडलेले असून वाढीव रकमेसह हे अनुदान दिले जाणार आहे. लाभार्थ्यांना आता एक ऐवजी दीड हजार रुपयांची रक्कम मिळणार आहे. जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे,उप-जिल्हाधिकारी स्मिता बेलपत्रे यांच्या मार्गदर्शनात संजय गांधी योजना विभागाकडून अनुदान वाटपाची प्रक्रिया आता सुरू आहे. लवकरच लाभार्थ्यांच्या खात्यात अनुदान जमा केले जाणार आहे.
हेही वाचा >>> धान घोटाळ्याप्रकरणी कोटलावार यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचे निर्देश; जिल्ह्यातील ४२ गिरणी मालकही चौकशीच्या फेऱ्यात
अनुदानात ५०० रुपयांची वाढ
निराधार पुरुष, महिला तसेच अनाथ मुले, दिव्यांगातील सर्व प्रवर्ग, क्षयरोग, कर्करोग, एड्स, कुष्ठरोगसारख्या आजारांमुळे स्वतःचा चरितार्थ चालवू न शकणारे पुरुष व महिला, निराधार, विधवा, घटस्फोटित, तसेच पोटगी न मिळालेल्या महिला, तृतीयपंथी, देवदासी, ३५ वर्षावरील अविवाहित महिला,तुरुंगात शिक्षा भोगलेल्या कैद्यांची पत्नी, सिकलसेलग्रस्त असे लाभार्थी हे संजय गांधी निराधार योजनेत समाविष्ट आहे. या योजनेमध्ये दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाच्या यादीत नाव तसेच २१ हजार रुपयांपर्यंत वार्षिक उत्पन्न असणे आवश्यक आहे. या योजनेत पात्र लाभार्थ्याना आतापर्यंत १ हजार रुपयांचे अनुदान मिळत होते. परंतु आता आता केंद्र व राज्य शासनामार्फत १५०० रुपये दरमहा अर्थसहाय्य देण्यात येणार आहे.
हेही वाचा >>> “नाना पटोले हे महाराष्ट्राचे पप्पू”, सुधीर मुनगंटीवार असे का म्हणाले…
नोव्हेंबरचेही अनुदान दिवाळीपूर्वीच मिळणार
राज्य सरकारने संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन या योजनेमधून कोट्यवधीचे अनुदान जिल्ह्यांना वितरित करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. येत्या आठ ते दहा दिवसांमध्ये ही प्रक्रिया पूर्ण होऊन, लाभार्थ्यांच्या बँक खात्यांमध्ये अनुदानाची ही रक्कम जमा करण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे दिवाळीपूर्वीच ही रक्कम मिळणार आहे.
“जिल्ह्यातील सर्व पात्र लाभार्थ्यांना शासनाच्या निकषानुसार अनुदान दिले जाईल. विशेष म्हणजे, अनेक लाभार्थी या योजनांचा लाभ घेण्यापासून वंचित राहतात. करिता वेळोवेळी तालुका स्तरीय शिबीराचे आयोजन करण्यात येते. याचा पात्र लाभार्थ्यांनी लाभा घ्यावा.” –एन. ए. बितले, नायब तहसीलदार, संजय गांधी योजना, जिल्हाधिकारी कार्यालय, गोंदिया