लोकसत्ता टीम
नागपूर : आगामी महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजपने शहरासाठी विविध विकास कामांची घोषणा केली आहे. महसूलमंत्री व पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रेस क्लबमध्ये झालेल्या संवाद कार्यक्रमात शहरात एक हजार कोटी रुपयांच्या नवीन २९ प्रकल्पांची उभारणी होणार असल्याची माहिती दिली.
यात दोन्ही बसस्थानकांचे नूतनीकरण, नवीन जिल्हाधिकारी कार्यालय, नवीन कारागृह, यशवंत स्टेडियमचे नूतनीकरण अशा प्रकल्पांचा समावेश आहे. यासंदर्भात महापालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक झाली असून नागपूर सुधार प्रन्यासच्या हद्दीत येणाऱ्या जागांसाठी नवीन विकास आराखडा तयार करा, अशा सूचना दिल्याचेही बावनकुळे म्हणाले.
मार्च किंवा एप्रिल महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे. नागपूर महापालिकेवर अनेक वर्षांपासून भाजपची सत्ता आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपला महाराष्ट्रातून कमी जागा मिळाल्या असल्या तरी विधानसभेत मोठे यश मिळाले आहे. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजपने कंबर कसली आहे. या निवडणुकांना डोळ्यासमोर ठेवून भाजपने शहरातील विविध २९ विकास कामांची घोषणा केली आहे. यासाठी एक हजार कोटींची तरतूद केली जाईल, असे बावनकुळे यांनी सांगितले.
पालकमंत्री म्हणजे शोभेची वस्तू नसून सरकार व प्रशासनाचा महत्त्वाचा दुवा आहे. त्यामुळे सरकारचा संपूर्ण लाभ, योजना जनतेपर्यंत पोचवण्यासाठी काम करणार, असा निर्धार बावनकुळे यांनी व्यक्त केला. शहरातील अनेक महत्त्वाचे प्रकल्प रखडलेले आहे. यासाठी महापालिकेमध्ये बैठक घेण्यात आली असून गणशपेठ आणि मोरभवन बसस्थानकाचे नूतनीकरण करायचे आहे. तसेच कारागृहासाठी जागा ठरली असून तेथे सुरुवात होणार आहे. २९ प्रकल्पांना लवकरच सुरुवात होणार असल्याचेही बावनकुळे म्हणाले. २०१४ ते २०१९ या काळात महाराष्ट्राच्या विकासाला गती मिळाली होती. परंतु, उद्धव ठाकरे यांच्या काळात विकास थांबला. आता राज्याचा विकास जोरात होणार असल्याचेही ते म्हणाले.
दीक्षाभूमीचा विकास होणार
पाच वर्षात पालकमंत्री म्हणून प्रत्येक क्षण विकास कामासाठी द्यायचा आहे. दीक्षाभूमीचा विकास काही कारणाने रखडला आहे. यासाठी सर्वांसोबत बैठक घेऊन नव्याने आराखडा तयार करण्यात येईल. दीक्षाभूमीच्या विकासाला प्राधान्य आहे. यासोबतच रामटेक परिसराच्या विकासाचा आराखडा मार्गी लावू. त्यासाठी बैठकी घेणार असून यात स्वतः मुख्यमंत्री फडणवीस लक्ष घालतील, असेही बावनकुळे म्हणाले.
या कामांचा समावेश
नागपूर शहरात दोन बसस्थानक आहेत. गणेशपेठ आणि मोरभवन या दोन्ही बसस्थानकांचा विकास होणार आहे. तर अजनी चौक जवळ असलेले कारागृह नवीन ठिकाणी बांधण्यात येणार आहे. यासोबतच सिताबर्डी येथील यशवंत स्टेडीयमच्या जागेवर नवीन विकास प्रकल्पाचे काम होणार आहे. त्यामुळे अशा महत्त्वाच्या कामांचा समावेश असल्याने भविष्यात शहराचा चेहरामोहरा बदलणार आहे.