नागपूर : वेगळ्या विदर्भ राज्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र दिनी उमरेड येथे कोळसा रोको आंदोलन करणार असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विदर्भातील सगळ्या दहा खासदारांना गावबंदी करण्यात येईल, अशी घोषणा विदर्भ राज्य आंदोलन समितीने केली आहे. विदर्भ राज्याचा युवा जागर करणारे व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जिल्ह्यातील खासदारांना तसेच जिल्ह्यात येणाऱ्या सर्व केंद्रीय मंत्र्यांना गावबंदी करून विदर्भाचे राज्य केव्हा देणार, असे प्रश्न विचारण्यात येईल.
१ मे २०२३ ला महाराष्ट्र दिनी महाराष्ट्र दिनाचा निषेध म्हणून केंद्र सरकारला विदर्भाच्या जनतेच्या भावना कळवण्याकरिता व विदर्भाच्या संपत्तीची लूट थांबवण्याकरिता उमरेडजवळील कोळसा खाणीसमोरील रस्त्यावर कोळसा रोको आंदोलन करण्यात येणार आहे. समितीची सोमवारी बैठक झाली. त्यात हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला विदर्भ राज्य आंदोलन समितीचे अध्यक्ष ॲड. वामनराव चटप, कोअर कमेटी बैठकीला विदर्भ प्रदेश महिला अध्यक्षा रंजना मामर्डे, ज्येष्ठ नेते डॉ. श्रीनिवास खांदेवाले, पूर्व विदर्भाचे अध्यक्ष अरुण केदार, युवा आघाडीचे प्रदेश अध्यक्ष मुकेश मासुरकर, कोर कमेटी सदस्य तात्यासाहेब मत्ते, विष्णुपंत आष्टीकर, माजीमंत्री डॉ. रमेश गजबे, प्रा. प्रभाकर कोंडबत्तुनवार, माजी पोलीस आयुक्त डॉ. दिलीप झळके पाटील, प्रा. पुरुषोत्तम पाटील, बळीराजा पार्टी राष्ट्रीय अध्यक्ष महेंद्र धावडे उपस्थित होते.