नागपूर : करोनाच्या काळात ज्या कुटुंबातील कर्ता पुरुष गेला अशा कुटुंबातील पाल्यांचा शिक्षणाचा खर्च नियमात बसेल तर तो शासना – कडून करण्यात येईल आणि ज्यांचे अर्ज नियमात बसणार नाही, अशांचा खर्च समाजातील दानशूर व्यक्तींकडून होणारी मदत व सामाजिक दायित्व निधीतून करण्यात येईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरात केली.

करोनामुळे घरातील कर्ता पुरुष गमावलेल्या भगिनींसाठी हक्काचा आधार ठरलेल्या सिद्धिविनायक सेवा ट्रस्ट द्वारा संचालित ‘सोबत पालकत्व प्रकल्प’तर्फे शनिवारी आयोजित संवेदनशील दिवाळी मिलन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी २६३ परिवारांना धान्य संच व दिवाळी फराळाचे वितरण करण्यात आले. जेरील लॉन येथे झालेल्या या कार्यक्रमाला आमदार प्रवीण दटके, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. राज गजभिये उपस्थित होते.

हेही वाचा : विश्लेषण : टी-२० विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तान धोकादायक संघ… पण जगज्जेतेपदाची संधी किती?

यावेळी फडणवीस म्हणाले, सोबत पालकत्व प्रकल्पातंर्गत २५३ परिवारातील कोणाचेही शिक्षण थांबता कामा नये. शासनाच्या शिक्षणासंबंधी ज्या काही योजना आहेत त्या योजनेत व नियमात बसतील त्यांना शासनाकडून आर्थिक मदत करण्यात येईल. मात्र जे नियमांत बसणार नाही त्यांच्यासाठी समाजाने पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून निर्णय घ्यावा असेही फडणवीस म्हणाले.

हेही वाचा : चंद्रपूर: वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार; वनविभागाविरुद्ध नागरिकांत संताप

करोनामुळे कर्ता पुरुष गमावलेल्यांसाठी सिद्धी विनायक सेवा ट्रस्टने पुढाकार घेतला. याबाबत संदीप जोशी यांनी माझ्यासोबत चर्चा केली होती. त्यांनी हा प्रकल्प मार्गी लावल्यामुळे अनेक कुटुंबांना आज मोठा दिलासा मिळाला आहे. ज्या कुटुंबाचा यात समावेश करण्यात आला नाही अशा कुटुंबाची माहिती घेऊन त्यांचाही या योजनेत समावेश करण्यात यावा, असेही फडणवीस म्हणाले. संदीप जोशी यांनी या प्रकल्पाची माहिती दिली. संचालन रेणुका देशकर यांनी केले.

Story img Loader