लोकसत्ता टीम

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नागपूर : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची लगबग सर्वच पक्षांच्या उमेदवारांनी सुरू केली. भाजपने तर उमेदवारी यादी जाहीर करण्यात आघाडी घेतली तसेच उमेदवारी अर्ज ही भरणे सुरू केले. नागपूर भाजपचे सत्ता केंद्र आहे. शुक्रवारी भाजपाचे सर्वात प्रभावशाली नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी अर्ज दाखल केले. त्यापूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी एक आशीर्वाद सोहळा पार पडला.

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे २५ ऑक्टोबर रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी नागपुरात कालच आले. दक्षिण-पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघातून ते आपला उमेदवारी अर्ज सादर करण्यापूर्वी. सकाळी १०:१५ वाजता ते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी गेले. त्यावेळी त्यांच्यासोबत प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे होते. दोन्ही नेत्यांची गडकरी यांच्या सोबत चर्चा झाली. त्यानंतर पारंपारिक पद्धतीचा कौटुंबिक सोहळा पार पडला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पत्नी व सामाजिक कार्यकर्त्या कांचन गडकरी यांनी भाजप-महायुतीचे उमेदवार देवेंद्र फडणवीस व चंद्रशेखरजी बावनकुळे यांचे औक्षण केले व विजयी भव! असा आशीर्वाद दिला. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजप-महायुतीचा विजय होई, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

आणखी वाचा-उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी देवेंद्र फडणवीसांचे नागपुरात शक्तीप्रदर्शन; मविआला लक्ष्य करत म्हणाले, “लाडक्या बहिणी विरोधकांना…”

संविधान चौकातून मिरवणूक

गडकरी, फडणवीस, बावनकुळे हे तीनही नेते गडकरी यांच्या निवासस्थानाहून संविधान चौकात आले तेथून सकाळी ११ वाजता रॅलीला प्रारंभ झाला. तेथून ही मिरवणूक नागपूर तहसील कार्यालयात आली. तिथे फडणवीस यांनी उमेदवारी अर्ज सादर केला. देवेंद्र फडणवीस हे यापूर्वी दोन वेळा पश्चिम नागपूरमधून निवडून आले आहेत, तर त्यानंतर नव्याने तयार झालेल्या दक्षिण-पश्चिम नागपूरमधून तीन वेळा निवडून आले आहेत. सलग ५ वेळा निवडून आलेले देवेंद्र फडणवीस यांची ही सहावी विधानसभा निवडणूक आहे. १९९९ पासून त्यांच्या आमदार म्हणून कारकिर्दीला २५ वर्ष पूर्ण झाले आहेत.

राज्यातून आजपर्यंत ५५२ उमेदवारांचे अर्ज

विधानसभेच्या २८८ मतदारसंघात निवडणुकीकरिता नामनिर्देशन पत्र भरण्याचा आज तिसरा दिवस आहे. तिसऱ्या दिवशी म्हणजे २४ ऑक्टोबर २०२४ रोजी राज्यातून आजपर्यंत ५५२ उमेदवारांचे ७२० नामनिर्देशन पत्र दाखल झाली आहेत, अशी माहिती, मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे.

आणखी वाचा-अमरावती जिल्‍ह्यात काँग्रेसची जुन्‍याच चेहऱ्यांना पसंती, पारंपरिक विरोधकांशीच सामना

महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीची आदर्श आचारसंहिता १५ ऑक्टोबर २०२४ पासून लागू झाली असून २२ ऑक्टोबर २०२४ रोजी निवडणूक अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली. नामनिर्देशन पत्र भरणे सुरु असून २९ ऑक्टोबरला नामनिर्देशन पत्र भरण्याची शेवटची तारीख आहे. या अर्जाची ३० ऑक्टोबरला छाननी करण्यात येऊन ४ नोव्हेंबर २०२४ रोजी अर्ज मागे घेता येईल. मतदान २० नोव्हेंबरला होत असून २३ नोव्हेंबर २०२४ रोजी मतमोजणी होणार आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Devendra fadnavis and chandrasekhar bankules blessing ceremony was held at nitin gadkaris residence cwb 76 mrj