विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस आहे. सभागृहात अंतिम आठवडा प्रस्ताव सादर केला गेला. त्यावर सत्ताधाऱ्यांनीही उत्तर दिलं. परंतु, विरोधकांनी विदर्भाच्या मुद्द्यांवरून चर्चाच केली नसल्याचा दावा मंत्र्यांनी केला. अंतिम आठवडा प्रस्ताव सादर करताना विरोधकांनी विदर्भावर चर्चा केली नसल्याचं राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. यावरून विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांनी आक्रमक होऊन आपली बाजू मांडली. मात्र, यावरही फडणवीसांनी चोख प्रत्युत्तर दिलं.
“देवेंद्र फडणीसांनी सांगितलं की विदर्भावर आम्ही बोललोच नाही. मी गडचिरोली ते बुलाढाणाच्या प्रत्येक तालुक्याच्या विकासाचा प्लान दिला आहे. त्यावर २९३ वर स्पष्टता मांडली आहे. परंतु, यांचे वित्तमंत्री म्हणाले की विदर्भाचा बॅकलॉग संपला आहे. सरकारला विदर्भाला न्याय द्यायचाच नाही, हे सरकारने सांगावं. विदर्भावर चर्चा करायला सरकार तयार नाही. हे सरकार विदर्भाच्या विकासाच्या विरोधात आहेत”, असं नाना पटोले म्हणाले.
हेही वाचा >> “मुंबईत मुली रात्री १२ वाजता…”, महिला सुरक्षेसंदर्भात फडणवीसांचं विधानसभेतील विधान चर्चेत!
नाना पटोलेंना उत्तर देताना फडणवीसांनीही पलटवार केला. “मी वस्तुस्थिती लक्षात आणून दिल्याने त्यांना मिरची लागली. तुम्हाला संधी होती. नागपूरच्या प्रत्येक अधिवेशनात विरोधी पक्ष अंतिम आठवडा प्रस्ताव देताना विदर्भावर देतो. तुम्ही एकतरी दिला का? तुम्हाला तीनवेळा संधी होती. एक ओळ टाकली म्हणजे विदर्भाचा प्रस्तवा होतो का? आता यांना सांगितलं म्हणून मिरची लागली”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
“सुनील प्रभू विदर्भावर आक्रमक आहेत. ज्यांनी विदर्भावर अन्याय केला तेच आता आक्रमक आहेत. तुमचा खरा चेहरा उघड झालाय म्हणून मिरची लागली आहे. वरच्या सभागृहात याबाबत चर्चा सुरू आहे. मी यावर उत्तर देणारच आहे”, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.