प्रशांत देशमुख
पक्षाची सत्ता आली की सामान्य कार्यकर्त्यांना आनंद होतो. सत्तेचा लाभ मिळणार, अशी सुप्त भावना असते. आपल्यामार्फत जनतेची कामे मार्गी लागणार, असा भाव विविध अशासकीय समिती मिळाली की उमटतो. तेच चाणाक्ष समजल्या जाणाऱ्या उपमुख्यमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी कदाचित ओळखले असावे. तडकाफडकी एकूण चौसष्ठ अशा समित्या जाहीर करून टाकल्या. या सर्व समित्यांवर तीनशे ते साडेतीनशे कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांची वर्णी लागली आहे.
हेही वाचा >>>चंद्रपूर: रागाच्या भरात वाईन शॉप मालकाने ग्राहकाच्या डोक्यात मारली दारूची बाटली
संजय गांधी निराधार योजना, वृद्ध कलावंत, परिवहन, दक्षता, विद्युत कंपनी व अन्य जिल्हा व तालुका पातळीवरील या समित्या आहेत. काँग्रेस राजवटीत कार्यकर्त्यांना नेहमीच प्रतीक्षा असायची. त्या पार्श्वभूमीवर भाजपने तत्परता दाखवून कार्यकर्त्यांना आनंदित करून टाकले आहे. त्यातही खासदार किंवा आमदार यांच्या मर्जीतील असण्याशी सोयरसुतक नाही. यांनी केवळ पक्षाच्या जिल्हाध्यक्षांकडे नावे सुचवायची.
हेही वाचा >>>नागपूर: आता रक्त नमुन्याविना ३० सेकंदात हृदयरोगाचे निदान; युरोपीयन हेल्थ जनरलमध्ये संशोधन प्रसिद्ध
जिल्हाध्यक्ष पालकमंत्र्यांकडे नावांची शिफारस करणार. त्यामुळे कोणा एकाचे वर्चस्व या समित्यांवर नसते. जिल्हाध्यक्ष सुनील गफाट म्हणाले की, सर्व चौसष्ठ समित्या पालकमंत्री फडणवीस यांनी जाहीर करून टाकल्या आहेत. काम करणाऱ्या प्रामाणिक व्यक्तीस संधी देण्याचा हेतू आहे. वाद नाहीच, असे त्यांनी स्पष्ट केले. फक्त एक अपवाद म्हणजे वृद्ध कलावंत समितीचे अध्यक्षपद गुरुदेव सेवा मंडळाचे सर्वाधिकारी प्रकाश महाराज वाघ यांच्याकडे सोपविले आहे. मात्र, या नियुक्त्या भाजपा वर्तुळातील सामान्य कार्यकर्त्यांना आनंद देणाऱ्या ठरल्याचे चित्र आहे.