नागपूर विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका जाहीर झाल्याने शैक्षणिक क्षेत्रातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. नागपूर शिक्षक मतदारसंघाच्या जागेसाठी यंदा भाजपामधूनही अनेक जण इच्छुक असल्याची माहिती समोर आली आहे. तर, अनेक वर्षांपासून ही जागा शिक्षक परिषदच लढवत आलेली आहे आणि भाजपाकडून त्यांच्या उमेदवारास पाठिंबाही देण्यात आलेला आहे.
भाजप मधून यावेळी नागपूर शिक्षक मतदारसंघातून सलग दोनवेळा विजय मिळवणारे विद्यमान आमदार नागो गाणार यांना भाजपकडून उमेदवारी मिळणार की, नव्या चेहऱ्यांना संधी मिळणार याबाबत उत्सूकता आहे. भाजप शिक्षक आघाडीचे अनिल शिवणकर आणि माजी महापौर व शिक्षण मंचाच्या प्रमुख डॉ. कल्पना पांडे यांनीही भाजपकडून उमेदवारीसाठी दावा केला आहे. गाणार यांची उमेदवारी शिक्षक परिषदेने भाजपाशी सल्लामसलत न करताच जाहीर केल्याने भाजपा दुसरा उमेदवार देणार का याकडे सर्वांचे लक्ष आहे. या पार्श्वभूमीवर आज नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपाची भूमिका जाहीर केली.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, नागपूर शिक्षक मतदारसंघाची जागा नेहमीच शिक्षक परिषद लढवते. शिक्षक परिषद जे उमेदवार ठरवतात, त्यांना आम्ही समर्थन देत असतो, त्यामुळे आता आपल्याला लवकरच त्या संदर्भात समजेल.
याचबरोबर, भाजपाकडून अनेकजण इच्छुक आहेत, पण साधारणपणे वर्षानुवर्षे ही जागा शिक्षक परिषदच लढवते आहे, त्यामुळे शिक्षक परिषदच ही जागा लढवेल असं माझं मत आहे. असंही फडणवीसांनी यावेळी स्पष्ट केलं.
या अगोदर विधान परिषदेच्या नागपूर शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीसाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे उमेदवार व माजी आमदार नागो गाणार यांनाच पाठिंबा देण्याचा निर्णय भारतीय जनता पक्षाने घेतल्याचे संकेत भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही नागपुरात दिलेले आहेत.
शिक्षक मतदार संघाचा द्विवार्षिक निवडणूक कार्यक्रम जाहिर केला आहे. नागपूर शिक्षक मतदार संघात निवडणुकीसंदर्भात मतदाराला कोणत्याही प्रकारच्या तक्रारी असल्यास यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये २४ तास कार्यरत नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे.