नागपूर : विधानसभेच्या निवडणुका झाल्या, निकाल लागले, महायुतीला बहुमत मिळाले, भारतीय जनता पक्ष सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला. आता प्रतीक्षा आहे ते मुख्यमंत्री कोण होणार याचीच. अर्थाच भाजपला वाटते देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री व्हावे. तसे झाले तर त्यांचा नागपूर हिवाळी अधिवेशन काळात मुक्काम हा मुख्यमंत्र्यांचे अधिकृत शासकीय निवासस्थान ‘रामगिरी’वर असेल व तसे झाले नाही व ते उपमुख्यमंत्री म्हणूनच नागपूर अधिवेशनाला आले तर त्यांचा मुक्काम नेहमीप्रमाणे ‘देवगिरी’या उपमुख्यमंत्र्यांसाठी असणाऱ्या बंगल्यावर असेल. पण सध्या काहीच चित्र स्पष्ट झाले नाही. त्यामुळे अधिवेशनासाठी मंत्र्यांच्या बंगल्यांची देखभाल दुरुस्ती करणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागाची मात्र पंचाईत झाली आहे.
लोकसभा निवडणुकीत झालेला दणदणीत पराभव पचवून भारतीय जनता पक्ष विधानसभा निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास येण्यामागे ज्या कोण्या लोकांचे परिश्रम कारणीभूत आहेत त्यापैकी सर्वाधिक योगदान हे नागपूरकर देवेंद्र फडणवीस यांचे आहे. त्यामुळे त्यांनाच मुख्यमंत्री करावे ही मागणी राज्यातील भाजप नेत्यांची असणे स्वाभाविक आहे. केंद्रीय नेतृत्वाला ते कितपत मान्य होते यावरच याबाबतचा निर्णय अवलंबून आहे. मात्र यासर्व घडामोडींचा संबध डिसेंबर महिन्यात नागपूरमध्ये होणाऱ्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाशी आहे. या काळात संपूर्ण राज्य सरकारच नागपूरमध्ये दाखल होते. त्यासाठी प्रशासनाला तयारी करावी लागते. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि इतर मंत्र्यांचे बंगले व त्यांच्या देखभाल दुरुस्तीचा यात समावेश असतो.
हेही वाचा – लोकसभेला ईव्हीएममध्ये दोष नव्हता का? बावनकुळेंचा विरोधकांना सवाल
गेले अडिच वर्षे फडणवीस उपमुख्यमंत्री म्हणून देवगिरी या बंगल्यावर मुक्कामाला असत. जर ते मुख्यमंत्री झाले तर त्यांना रामगिरी हा मुख्यमंत्र्यांसाठी राखीव असलेला बंगला मिळेल. त्यामुळे सध्याचे उपमुख्यमंत्र्यांचे कार्यालय व अन्य कर्मचारी त्यांना रामगिरीवर हलवावे लागले. मुख्यमंत्रीपदाचा निर्णय एकदाचा झाला की प्रशासनाला त्यादृष्टीने तयारी करणे सुयोग्य होते. सध्या अस्पष्ट चित्र असल्याने प्रशासनही गोंधळले आहे. फडणवीस हे मुख्यमंत्रीपदाचे दावेदार आहेत आणि विशेष म्हणजे ते नागपूरचे आहेत. त्यामुळे प्रशासन सध्या अलर्ट मोडवर आहे.
हेही वाचा – मंत्रिपदी कोणाची वर्णी लागणार? धर्मरावबाबा आत्राम आणि डॉ. मिलिंद नरोटे यांची नवे चर्चेत…
२०१४ ते २०१९ या पाच वर्षांत देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांचा मुक्काम रामगिरी बंगल्यावर राहात असे. २०१९ मध्ये महाविकास आघाडी सरकार आले. तेव्हा ते विरोधी पक्षनेते होते. त्यामुळे त्यांना स्वतंत्र बंगला देण्यात आला होता. त्यानंतर अडिच वर्षाने ते उपमुख्यमंत्री झाले. त्यानंतर त्यांचा निवास देवगिरी या बगल्यावर होता. तेथे त्यांचे स्वत:चे कार्यालय आहे. आता ते रामगिरीवर कधी जातात याची प्रतीक्षा आहे.