नागपूर : राज्यात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराने वेग धरला आहे. राज्यातील सर्वच मतदारसंघात प्रमुख पक्षांसह छोटे पक्ष आणि अपक्षही जोरदार प्रचार करत आहे. राज्यातील महत्वपूर्ण असे मतदारसंघ असलेल्या नागपूर दक्षिण-पश्चिमच्या मतदारसंघाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे कारण या मतदारसंघातून स्वत: भाजपचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यांच्याविरोधात महाविकास आघाडीने काँग्रेसचे प्रफुल गुडधे पाटील यांना मैदानात उतरवले आहे. दक्षिण-पश्चिम मतदारसंघात मुख्य लढत भाजपच्या देवेंद्र फडणवीस आणि कॉँग्रेसच्या प्रफुल गुडधे पाटील यांच्यात होत असली तरी मैदानात इतर दहा उमेदवारही जोरदार प्रचार करत आहे. यापैकीच एक असलेले अपक्ष उमेदवार सचिन वाघाडे त्यांच्या अनोख्या प्रचारामुळे सध्या चर्चेत आहेत. दक्षिण-पश्चिम विधानसभा क्षेत्रातील शंकरनगर परिसरातील त्यांचे प्रचाराचे छायाचित्र समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहेत.


सर्वात तरुण उमेदवार, मालमत्ता केवळ अकराशे रुपये

दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघात यंदा एकूण बारा उमेदवार रिंगणात आहेत. यापैकी तीस वर्षीय सचिन वाघाडे सर्वात तरुण उमेदवार आहेत. सचिन नागपूरच्या महाल परिसरातील रहिवासी आहे. सध्या तो एलएलबीचे शिक्षण घेत आहे. यापूर्वी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातून सचिनने बीएससीची पदवी आणि नंतर भौतिकशास्त्र विषयात एमएससीचे पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. २०२४-२०२५ या वित्त वर्षात त्याचे उत्पन्न केवळ एक हजार १०० रुपये असल्याचे त्याने शपथपत्रात सांगितले आहे. सचिनच्या नावावर तीन लाख ३२ हजार रुपयांचे कर्जही आहे. सचिनकडे ६० हजार किंमतीची एक बाईक आणि हातात अकरा हजार रोख रक्कम आहे. सचिनवर अमरावती जिल्ह्यातील चांदुर बाजार येथे एक गुन्हा देखील दाखल आहे.

हेही वाचा – ‘भाजपने महाराष्ट्र लुटण्यासाठीच मविआ सरकार पाडले’, उद्धव ठाकरेंचा आरोप

हेही वाचा – वर्धा : अखेर शरद पवार थेट ‘हिंगणघाटच्या शरद पवारां’च्या घरी, म्हणाले…

चौकात उभा राहून प्रचार

एकीकडे प्रमुख पक्षाचे उमेदवार लाखो रुपये खर्च करून जोरदार प्रचार करत आहे तर अपक्ष उमेदवार सचिन वाघाडे मतदारसंघातील चौकात जाऊन स्वत:साठी मतांची मागणी करत आहे. शंकरनगर चौकात उभे असताना असेच एक छायाचित्र सध्या व्हायरल होत आहे. यात सचिन एक फलक घेऊन उभा आहे. सचिनला निवडणुकीसाठी बॅट हे चिन्ह प्रदान करण्यात आले आहे. ‘मी बेरोजगार नागपूर दक्षिण-पश्चिमचा उमेदवार…’ अशा आशयाचे हे फलक आहे. मला मते द्या आणि माझी बेरोजगारी दूर करा, मी मतदारसंघातील तरुणांची बेरोजगारी दूर करेल, असे आश्वासन सचिन यावेळी देताना दिसतो. सध्या सचिनचा हा प्रचार नागपूरमध्ये लक्षवेधक ठरत आहे.