यवतमाळ : चार वर्षांपूर्वी पोहरादेवी विकास आराखड्यास आपण १०० कोटींचा निधी दिला होता. त्यानंतर सरकार बदलले आणि अडीच वर्षे येथील विकासासाठी फुटकी कवडीही मिळाली नाही. संत सेवालाल महाराजांच्या आशीर्वादाने पैसे न देणाऱ्यांना घरी बसवले आणि आता पैसे देणाऱ्यांचे सरकार आले आहे. बंजारा समाजाला आम्ही काहीही कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पोहरादेवी (वाशीम) येथे केली.
चार वर्षांपूर्वी डिसेंबर २०१८ मध्ये मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत १२५ कोटी रुपयांच्या पोहरादेवी विकास आराखड्यातील विकासकामांचे भूमिपूजन झाले होते. त्यानंतर २०१९ मध्ये झालेल्या निवडणुकीत शिवसेनेने मविआसोबत सरकार स्थापन केले. हाच धागा पकडून देवेंद्र फडणवीस यांनी तत्कालीन मविआ सरकारवर आपल्या भाषणात टीकास्र सोडले. मविका सरकारच्या कार्यकाळात पोहरादेवीस अडीच वर्षे फुटकी कवडीदेखील मिळाली नाही. म्हणून जे पैसे देत नव्हते त्यांना घरी बसवले व पैसे देणाऱ्यांना सत्तेत आणले, असे फडणवीस यावेळी म्हणाले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मला अर्थमंत्री करून तिजोरीची चावी माझ्याकडे दिली. ही तिजोरी बंजारा समाजासाठी उघडा, असे सांगितले व ५९३ कोटी रुपये दिले. आता काम थांबू देणार नाही, सर्व विकास करू, अशी ग्वाही फडणवीस यांनी दिली. पोहरादेवी येथील विविध प्रकल्पांसाठी जागा देणारे अनंतराव पाटील यांनाही फडणवीस यांनी, ‘पाटील साहेब आपण जागा दिली, आता काळजी करू नका. आपल्याला आम्ही काहीही कमी पडू देणार नाही’, असा विश्वास दिला. फडणवीस यांच्या या वक्तव्याने वाशीमच्या राजकारणात येत्या काळात काही नवीन समीकरणे उदयास येण्याची शक्यता व्यक्त होत आहे.