राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची तिसऱ्यांदा शपथ घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांचे १२ डिसेंबरला त्यांचे गृहशहर नागपूरमध्ये आगमन होत आहे. त्यांच्या भव्य स्वागताची तयारी भाजपने सुरू केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

२०१४ मध्ये फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांचे नागपूरमध्ये भव्य स्वागत करण्यात आले होते.विमानतळापासून मिरवणुकीने त्यांना त्यांच्या धरमपेठमधील निवासस्थानी नेण्यात आले होते. वाटेत ठिकठिकाणी त्यांचे नागपूरकरांनी स्वागत गेले होते. दुसऱ्यांदा त्यांनी २०१९ मध्ये मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. पहाटेचा शपथविधी म्हणून त्याची राजकीय वर्तुळात चर्चा आजही होते. त्यावेळी नागपुरात भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष केला होता. पण हे सरकार काही दिवसातच पडले. २०२४ च्या निवडणुकीत भाजपने १३२ जागा जिंकून सर्वात मोठ्या पक्षाचे स्थान मिळवले. भाजपचे गट नेते म्हणून निवड झाल्यावर त्यांनी पाच डिसेंबरला तिसऱ्यांदा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यानंतर प्रथमच त्यांचे गुरुवारी नागपुरात आगमन होत आहे. त्यानिमित्ताने भाजपने त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी सुरू केली आहे.

हेही वाचा – एकनाथ शिंदेंचे सरकारमधील स्थान दुसऱ्या क्रमांकाचे, शिंदेंना ‘देवगिरी’

१६ डिसेंबरपासून नागपूरमध्ये विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन आहे. या काळात फडणवीस पूर्णवेळ नागपुरात मुक्कामी असणार आहे. नागपुरातील दक्षिण-पश्चिम नागपूर मतदारसंघातून फडणवीस चौथ्यांदा विजयी झाले. या मतदारसंघातील मतदारांनी निवडलेला आमदार राज्याचा तिसऱ्यांदा मुख्यमंत्री होतो आहे. त्यामुळे मतदारसंघातही त्यांच्या स्वागताची तयारी भाजप कार्यकर्त्यांकडून केली जात आहे.

निवडणुकीचे निकाल लागल्यावर शहराच्या सर्व प्रमुख रस्त्यांवर फडणवीस यांचे पाठमोरे छायाचित्र असलेले फलक लागले होते व त्यावर ‘ मी पुन्हा येणार’ असे ठळकपणे लिहिले होते. मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर त्याच फलकाच्या जागी ‘ मी पुन्हा आलो’ असे लिहिलेले व फडणवीस यांचे फोटो असलेले फलक लागले होते. आता ते प्रत्यक्षातच १२ डिसेंबरला नागपुरात येत आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण आहे.

हेही वाचा – त्वचेवरील डागामुळे पोलीस नोकरीत अपात्र ठरविले, उच्च न्यायालयात प्रकरण…

निवडणूक प्रचार काळात राज्य शासनाच्या लाडकी बहीण योजनेला अनुसरून ‘लाडका देवाभाऊ’ असे फलक लागले होते. पुन्हा सत्तेत आल्यास लाडक्या बहिणीचे मानधन २१०० रुपये करणार अशी घोषणा महायुतीने केली होती. त्याबाबत फडणवीस नागपुरात काही घोषणा करणार का याकडे लाभार्थी महिलांचे लक्ष लागले आहे. दरम्यान मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री यांचेच शपथविधी पार पडले. अद्याप मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. तो विधिमंडळाच्या अधिवेशनापूर्वी होईल, असे भाकित वर्तवले जात आहे. त्यामुळे फडणवीस नागपुरात येण्यापूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार करणार की नागपूरहून गेल्यावर किंवा अधिवेशनादरम्यान करणार याकडे लक्ष लागले आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Devendra fadnavis first visit to nagpur after taking oath as chief minister successful preparation for reception cwb 76 ssb