लोकसत्ता टीम
नागपूर: पटोले ज्या पक्षाचे प्रतिनिधीत्व करतात तेथे टॉयलेटला जायचे असेल तर पक्षश्रेष्ठींची परवानगी घ्यावी लागते, त्यांनी आमच्यावर टीका करू नये, असा टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना लगावला.
ते नागपूर विमानतळावर पत्रकारांशी बोलत होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्ली दौऱ्यावर पटोले यांनी टीका केली होती. हे नेते दिल्लीत भाजप पक्षश्रेष्ठींची हुजुरगिरी करायला जातात, असे पटोले म्हणाले होते. याकडे फडणवीस यांचे लक्ष वेधले असता त्यांनी वरील प्रतिक्रिया दिली. भारतीय जनता पक्ष हा राष्ट्रीय पक्ष आहे. त्यामुळे विविध कामांसाठी दिल्लीत जावे लागते. त्यात गैर काहीही नाही, असे फडणवीस म्हणाले.