अकोला: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्रातील महायुती सरकारमध्ये घटक पक्षांनाच एका मागून एक धक्के देण्याचे प्रकार सुरू आहेत. आता मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आणखी एक मोठा धक्का दिला. देवेंद्र फडणवीस यांच्या गृह खात्याने राष्ट्रवादी पक्ष अजित पवार गटाच्या अकोट शहर अध्यक्षाला थेट तडीपार केले. या कारवाईची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.
राज्यातील महायुती सरकारमध्ये भाजपसह शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादीचा अजित पवार गट हे प्रमुख घटक पक्ष सहभागी आहेत. सत्ताधारी पक्षांमध्ये एकमेकांवर कुरघोडीचे राजकारण सुरूच असते. आता अकोला जिल्ह्यातील एका प्रकरणावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला कोंडीत पकडल्याचे चित्र दिसून येते. पाच सराइत गुन्हेगारांना जिल्ह्यातून एक वर्षाच्या कालावधीसाठी तडीपार करण्याचा आदेश अकोट येथील सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा अकोटचे उपविभागीय पोलीस अधिकारी अनमोल मित्तल यांनी निर्गमित केला. या कारवाईमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचा अकोट शहराध्यक्ष जाकीर शहा रशीद शहा याला देखील तडीपार करण्यात आले. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.
संवेदनशील म्हणून अकोला जिल्ह्याची ओळख आहे. त्यातच अकोट शहर अत्यंत संवेदनशील असून गुन्हेगारी कारवायांचे केंद्र म्हणून देखील ओळखले जाते. गुन्हेगारांवर वारंवार कारवाई केल्यानंतरही त्यांच्यात सुधारणा होत नसल्याने पोलिसांनी कठोर पावले उचलली आहेत. अकोट येथील पाच सराईत गुन्हेगारांना तडीपार करण्यात आले. ग्रामीण हद्दीतील अजमत शहा उर्फ अज्जु तयब शहा (रा. अडगाव खुर्द), जाकीर शहा रशीद शहा (रा. अमीनपुरा, अकोट), विजय साहेबरा अंभोरे, लखन साहेबराव अंभोरे (दोन्ही रा राजेंद्र नगर अकोट), हिवरखेड हद्दीतील अब्दूल वहीद अब्दुल रफीक (रा. अडगाव) यांना एक वर्षांसाठी तडीपार केले. यापुढे देखील त्यांचा गुन्हेगारी प्रक्रियेत सहभाग राहिल्यास थेट ‘एमपीडीए’ अंतर्गत कारवाई करण्याचा इशारा अकोला पोलीस दलातील अधिकाऱ्यांनी दिला.
सत्ताधारी पक्षाचा अध्यक्ष तडीपार; पक्षाची प्रतिमा मलीन
सत्ताधारी पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या शहराध्यक्षालाच तडीपार करण्यात आले आहे. या प्रकारामुळे गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या व्यक्तीला महत्त्वाच्या पदावर नियुक्त केल्याचा मुद्दा समोर आला असून पक्षाची प्रतिमा देखील मलीन झाली आहे.