भाजपा नेते आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राष्ट्रपतींच्या शपथविधी सोहोळ्यात पहिल्या रांगेत स्थान देऊन केंद्र सरकारने सन्मान केल्याने नागपूरसह राज्यभरातील त्यांचे समर्थक सुखावल्याचे दिसत असून त्यांनी आनंद व्यक्त केला आहे.
केंद्राने त्यांचा मान कायम असल्याचे अधोरेखित केले –
राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर फडणवीसच मुख्यमंत्री होतील, अशी खात्री त्यांच्या समर्थकांना होती. मात्र ऐनवेळी त्यांना उपमुख्यमंत्रीपद स्वीकारावे लागलेहोते. त्यामुळे केंद्रीय नेतृत्वाने फडणवीस यांच्यावर अन्याय केला, अशी भावना समर्थकांमध्ये निर्माण झाली होती. फडणवीस यांच्या अभिनंदन फलकातूनही ती प्रतिबिंबित झाली होती. या पार्श्वभूमीवर काल (सोमवार) दिल्लीत झालेल्या राष्ट्रपतींच्या शपथविधी सोहोळ्यात फडणवीस यांना सन्माननीय व्यक्तींसोबत पहिल्या रांगेत स्थान देऊन केंद्राने त्यांचा मान कायम असल्याचे अधोरेखित केले. त्यामुळे समर्थक सुखावले आहेत.
शिंदे –भाजपा युती सरकार आणण्यातही फडणवीसांचे महत्त्वाचे योगदान –
दरम्यान महाराष्ट्रात नुकत्याच पार पडलेल्या राज्यसभा आणि विधानपरिषद निवडणुकीत भाजपाला मिळालेल्या दणदणीत विजयाचे श्रेय फडणवीस यांना दिले जाते. त्याचप्रमाणे बिहार आणि गोवा विधानसभा निवडणुकीतही त्यांनी पक्षाला घवघवीत यश मिळवून दिले होते. महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार गडगडल्यावर स्थापन झालेल्या शिंदे –भाजपा युती सरकार आणण्यातही फडणवीस यांचे योगदान महत्त्वाचे होते.
शिंदे सरकारमध्ये त्यांनी भाजपा अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या सांगण्यावरूनच त्यांनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारून पक्षाच्या निर्णयाला सर्वोत्तम स्थान दिले होते. यामुळे फडणवीस यांचे दिल्लीत स्थान बळकट झाले आहे.