वर्धा : भाजपच्या पहिल्या यादीत आर्वीचे आमदार दादाराव केचे यांचे नाव उमटले नाही. अन्य दोन विद्यमान आमदार डॉ. पंकज भोयर व समीर कुणावार यांना मात्र तिसऱ्यांदा लढण्याची संधी मिळाली. केचे कां नाही, केचे काय करणार, असे प्रश्न चर्चेत आहे. याच अनुषंगाने आमदार केचे यांनी २४ ऑक्टोबरला दुपारी आर्वीत मेळाव्याचे आयोजन केले आहे. तसे पत्रक काढले.

त्यात ते म्हणतात की विधानसभा निवडणूक संदर्भात प्रमुख कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला आहे. त्यात विचारविनिमय होईल. आपण सर्व कार्यकर्त्यांच्या समक्ष निर्णय घेणे गरजेचे आहे. आपण उपस्थित रहावे, अशी आग्रहाची विनंती केचे करतात. मेळावा कश्यासाठी या थेट प्रश्नावर उत्तर देतांना ते म्हणाले, तिकीट जाहिर झाल्याने कार्यकर्त्यात असंतोष आहे. ते काय करतील नेम नाही, म्हणून मेळाव्यात चर्चा करणार. तसे आज मला डीसीएम ( उपमुख्यमंत्री फडणवीस) साहेबांनी बोलावले आहे. बघू.

आणखी वाचा-अवैध औषधविक्री करणाऱ्या मुंबईतील डॉक्टरला भंडाऱ्यात अटक

एकीकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भेटीस बोलावणे असल्याचे सांगणारे केचे हे मेळावा होणार असेही नमूद करतात. त्यामुळे पुढील दिवसात काय होणार, हा येथील राजकीय वर्तुळत कमालीचा उत्सुकतेचा भाग ठरत आहे. केचे पक्षश्रेष्ठिना आव्हान देण्याच्या भूमिकेत राहणार की तडजोड करणार, अशी उत्सुकता दिसून येते.

या ठिकाणी फडणवीस यांचे विश्वासू सुमित वानखेडे यांचे नाव संभाव्य उमेदवार म्हणून घेतल्या जात आहे. वानखेडे यांनी गत दोन वर्षात विविध विकास कामांचा धडाका लावत उमेदवारीकडे पाऊल टाकले असे म्हटल्या जाते. या काळात केचे यांनी अप्रत्यक्षपणे वानखेडे यांच्यावर टिकाही केली होती. मात्र ते सतत मीच उमेदवार राहणार, अशी ग्वाही पण देत होते. पण पहिल्या यादीत त्यांचे नाव नं आल्याने वातावरण तापले. आता मेळावा घेत केचे यांनी आव्हानात्मक भूमिका घेतली आहे. फडणवीस यांचे बोलावणे असल्याचे ते म्हणत आहे. म्हणजे फडणवीस – केचे बैठकीत काय मार्ग निघतो, ते महत्वाचे ठरणार. काही आश्वासन देऊन केचे यांना शांत करण्याचा प्रयत्न होणार की केचे तिसरी संधी घेतल्याशिवाय माघारी फिरणार नाही, असा तिढा आहे. तिकीट नं मिळाल्यास केचे बंडखोरी करणार, अशी पण चर्चा आर्वी परिसरात सूरू झाली आहे.