नागपूर : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचा गृहजिल्हा नागपूरवर अधिक लक्ष केंद्रित केले आहे. त्यांनी दोन दिवसांत चार मतदारसंघांचा आढावा घेतला. विशेष म्हणजे, फडणवीस तालुक्यातील सरकारी कामांचा आढावा बैठक घेतात आणि पक्षाचा मेळावाही घेतात. निवडणुकीला वेळ असल्याने फडणवीस हे कशासाठी करतात, नेमके त्यांच्या मनात काय, असे प्रश्न राजकीय वर्तुळात विचारले जात आहे. तालुकानिहाय विकास कामांचा आढावा घेतानाच त्याच ठिकाणी भाजपीचे मेळावेही घेत आहेत. आगामी निवडणुकीच्या तयारीचा भाग म्हणून याकडे बघितले जात आहे.
फडणवीस यांनी दोन दिवसांत नागपूर जिल्ह्यात काटोल, सावनेर, उमरेड आणि हिंगणा या चार मतदारसंघाचा तालुक्याच्या ठिकाणी जाऊन आढावा घेतला. चारपैकी हिंगणा वगळता तीन ठिकाणी विरोधी पक्षाचे आमदार आहेत हे उल्लेखनीय. सरकारच्या योजनांची अंमलबजावणी योग्यरित्या होते किंवा नाही हे पाहण्यासाठी तालुकानिहाय बैठका घेतल्या जात असल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले. पण प्रत्येक बैठकीच्या ठिकाणी भाजपा कार्यकर्त्यांचे मेळावेही आयोजित केले जात आहे आणि तेथे फडणवीस ‘जोरदार’ भाषणही ठोकत आहेत. शुक्रवारी त्यांनी सावनेर व काटोल या दोन तालुक्यात मेळावे व सभा घेतल्या. शनिवारी त्यांनी उमरेड व हिंगणा तालुक्यातील कामांचा आढावा घेतला. सावनेर कॉंग्रेसचा तर काटोल राष्ट्रवादीचा गढ मानला जातो.
हेही वाचा – नागपूर : कॉंग्रेसमधून निलंबित आशीष देशमुख यांच्या निवासस्थानी फडणवीस
सावनेरमध्ये पक्ष कार्यकर्त्यांना संबोधित करताना फडणवीस यांनी आपण कुणालाही घाबरत नाही, असे सांगितले. हा इशारा त्यांचा या भागाचे काँग्रेसचे आमदार सुनील केदार यांना होता. याच ठिकाणी २९ मे रोजी माजी आमदार डॉ. आशीष देशमुख यांनीही एक कार्यक्रम आयोजित केला आहे. देशमुख भाजपाकडून पुढची निवडणूक लढणार, अशी चर्चा सध्या असल्याने पक्षाच्या स्थानिक कार्यकर्त्यांच्या मनात चलबिचल आहे, हे ओळखून फडणवीस यांनी पुढचा उमेदवार हा स्थानिकच असेल असे सांगून संभ्रम दूर केला.