महालक्ष्मी सरस प्रदर्शनाचे नागपूरमध्ये उद्घाटन
बचत गटांना प्रत्येक जिल्हास्तरावर त्यांनी निर्मित केलेल्या वस्तूंच्या विक्री व प्रदर्शनासाठी कायमची जागा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना सूचना केली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केली.
रविवारी देशपांडे सभागृहात महालक्ष्मी सरस- २०१८ प्रदर्शनच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खासदार डॉ. विकास महात्मे, सुधाकर देशमुख, जोगेंद्र कवाडे, गिरीश व्यास, अॅड. आशीष जयस्वाल, मल्लिकार्जुन रेड्डी, निशा सावरकर, आसिम गुप्ता, अश्विन मुदगल, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय यादव उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, देशात महिलांच्या सहभागाशिवाय विकास शक्य नाही. पूर्वी महिलांचा मानव संसाधन म्हणून विचार होत नव्हता, परंतु त्या प्रत्येक क्षेत्रात चांगले काम करू शकतात. बचत गटाच्या माध्यमातून उद्योग करणाऱ्या महिलांची संख्या वाढत आहे. त्यांनी निर्मित केलेल्या वस्तूंची विक्री जोरात होत आहे. सध्या ती आठ कोटी व यावर्षी १० कोटींवर जाण्याची शक्यता आहे. ही विक्री किमान १०० कोटींवर जायला हवी. त्यासाठी शासन प्रयत्न करीत आहे. त्याचाच भाग म्हणून महिला बचत गटांना प्रत्येक जिल्ह्य़ात त्यांनी उत्पादित केलेल्या वस्तूंच्या प्रदर्शन व विक्रीसाठी कायम जागा उपलब्ध केली जाईल. त्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना सूचना केली जाईल. या जागेवर बचत गटांनाच त्यांचा उपक्रम राबवण्यासह महिलांना कौशल्य प्रशिक्षणाच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून दिला जाईल. सध्याच्या स्थितीत बचत गटाची चळवळ राज्यभरात वाढत असून लक्षावधी कुटुंबात रोजगाराचे स्रोत तयार झाले आहेत.
महिला बचत गटांनी उत्कृष्ट सॅनेटरी नॅपकीन कमी दरात उपलब्ध केले आहे. त्यामुळे त्यांची या क्षेत्रातील बडय़ा कंपन्यांशी स्पर्धा वाढत आहे. ऑनलाईन विक्रीच्या क्षेत्रातही बचत गटांनी उतरावे, असे फडणवीस म्हणाले. प्रास्ताविक आर. विमला यांनी तर आभार रवींद्र शिंदे यांनी मानले. याप्रसंगी चंद्रशेखर बावनकुळे, असिम गुप्ता यांनीही आपले मत मांडले.
१५ जिल्ह्य़ांत १४ प्रकारच्या भाज्या व फळांचे उत्पादन
सध्या राज्यातील १५ जिल्ह्य़ांमध्ये बचत गटांनी १४ प्रकारचे भाजी व फळांचे उत्पादन घेतले आहे. या चांगल्या दर्जाच्या भाजी- फळांमुळे राज्यातील कुपोषणही कमी होणे शक्य आहे. सध्या शासनाला ४० टक्केवरील कुपोषण कमी करून २० टक्क्यांवर आणण्यात यश आले आहे. उत्कृष्ट फळ-भाज्या शासनाने गर्भवती महिलांना उपलब्ध केल्यास त्याचा फायदा होईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.