विकास कामांसाठी निधी आणण्यासाठी लोकप्रतिनिधी धडपडत असतात. मिळाला तर श्रेयाचे धनी, न मिळाला तर त्याचे खापरही त्याच्यावरच फोडल्या जाते. मात्र, नेत्याच्या खाजगी सचिवास निधी मिळण्याचे श्रेय देण्याची चढाओढ राज्यात एकाच ठिकाणी दिसून येईल. आष्टीत न्यायालय इमारत व ग्रामीण रस्ते, आष्टी शहीद स्मृती स्मारक,गोविंदप्रभु देवस्थान , तळेगाव जंगल सत्याग्रह स्मारक या कामांसाठी अर्थमंत्री, उपमुख्यमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री असणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांनी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आष्टी भाजप तालुकाध्यक्ष अशोक विजयकर यांनी त्यांचे आभार मानले आहे. व हे काम मार्गी लागण्याचे म्हणजेच निधी मंजूर करवून घेतल्याबद्दल त्यांनी फडणवीस यांचे खाजगी सचिव सुमित वानखेडे यांची भरभरून प्रशंसा केली आहे. समाजमाध्यमातून व्यक्त होतांना ते सांगतात, की दिलेला शब्द लक्षात ठेवून तो पाळण्याची वानखेडे यांची कार्यशैली आहे.याबद्दल त्यांची सर्वत्र भरभरून प्रशंसा होत आहे.
हेही वाचा >>> यवतमाळ : पोलीस अधिकारीच अडकला सावकाराच्या पाशात!
शहीद वीरांना वानखेडे यांची ही खरी श्रद्धांजली होय.अधिक संदर्भ देतांना ते नमूद करतात की 14 फेब्रुवारी 2023 ला याची सुरुवात झाली.या दिवशी आष्टी तालुक्यातील मान्यवरांच्या शिष्टमंडळाची वानखेडे यांनी फडणवीस यांच्यासोबत भेट करून दिली होती. विषयांचे गांभीर्य लक्षात आणून दिले. याच भेटीचे फलित म्हणून अर्थसंकल्पात मागण्यांसाठी तरतूद झाली. सत्तर कोटी रुपये मंजूर झाले म्हणून आष्टीकर सुमित वानखेडे यांचे आभार मानत असल्याची भावना विजयकर व्यक्त करतात.वानखेडे हे शासकीय सेवेत आहे. मात्र या भागाचे आमदार भाजपचे दादाराव केचे आहेत, याचा विसरच पडावा,असा हा दाखला.