नागपूर : माझी कारकीर्द पश्चिम नागपूर मधून सुरू झाली. नगरसेवक, महापौर, आमदार याच मतदार संघातून झालो. मी मतदार देखील याच मतदारसंघाचा आहे. पण निवडणूक दक्षिण पश्चिम मधून लढत आहे. अशाच प्रकारे विकास ठाकरे हे दक्षिण पश्चिमचे मतदार आहेत आणि पश्चिम मधून निवडणूक लढत आहेत, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
पश्चिम नागपूरचे भाजपच्या उमेदवार सुधाकर कोहळे यांच्या प्रचारसभेत ते बोलत होते. व्यासपीठावर माजी महापौर संदीप जोशी, दयाशंकर तिवारी, माया इवनाते यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते.फडणवीस यांनी त्यांच्या भाषणात मागील दोन वर्षांत सरकारने सुरू केलेल्या योजनांची यादीच सांगितली तसेच काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले, नागपूर शहरात सिमेंट रस्ते, पाणी योजना, अविकसित लेआऊटची कामे भाजपच्या सत्ताकाळातच झाली.
झोपडपट्टीधारकांना मालकी पट्टे वितरित केले, खासगी जमिनीवरील झोपड्यांचा प्रश्न सोडवला. याउलट महाविकास आघाडी सरकारने विकास शुल्क वाढवले. ते आम्ही कमी केले. नागपूर शहरात अनेक नामांकित शैक्षणिक संस्था आल्या आहेत. लॉजिस्टिक पार्क होत आहे, क्रीडा विद्यापीठ तयार करण्यात येणार आहेत. नागपूरची वाटचाल पुण्यासारखी शिक्षण नगरी ते उद्योगनगरीकडे होत आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादीची (शरद पवार) १५ वर्षे सत्ता होती. त्यांनी नागपूर शहरासाठी काय केले, असा सवालही त्यांनी केला.
सुधाकर कोहळे हे बाहेरचे उमेदवार नाही
सुधाकर देशमुख यांनी निवडणूक लढणार असल्याचे सांगितले. त्यानंतर एका अनुभवी व्यक्तीला उमेदवारी देण्यात आली. एका मतदार संघाचे मतदार आणि दुसऱ्या मतदार संघातून निवडणूक लढणे म्हणजे बाहेरचा उमेदवार होत नाही. कोहळे शेजारच्या मतदार संघातील आहेत. आम्ही पाकिस्तान मधून उमेदवार आणला नाही. आशा शब्दात देवेंद्र फडणवीस यांनी कोहळे यांना विरोध करणाऱ्या पक्ष कार्यकर्त्यांना सुनावले.
हे ही वाचा… चंद्रपूर : रोकड, दारू, ड्रग्ज जप्त
संविधानाची पाने कोरी
काँग्रेस व राहुल गांधी यांच्यावरही फडणवीस यांनी टीका केली. राहुल गांधी संविधानाचा अपमान करत आहेत. ते लाल पुस्तक घेऊन फिरतात. त्यातील पाने कोरी असतात. त्यांना केवळ शहरी नक्षलींच्या मदतीने अराजक माजवायचे आहे. राहुल गांधी भारतात संविधान आणि आरक्षण बचावच्या गोष्टी करतात आणि अमेरिकेत आरक्षणाची आवश्यकता नसल्याचे सांगतात, असेही फडणवीस म्हणाले. संविधान सन्मान संमेलनात उपस्थितांना नोटपॅड वितरित करण्यात आले होते. मुखपृष्ठ लाल रंगाचे होते, त्यावर भारताचे संविधान असे लिहले होते.