बेकायदा कारवाया प्रतिबंध कायद्यांतर्गत दोषी ठरवण्यात आलेला नक्षल समर्थक प्रा. जी. एन. साईबाबा व त्याच्या सहकाऱ्यांची मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने आज निर्दोष मुक्तता केली. न्यायालयाच्या या निर्णयानंतर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीस यांनी हा निकाल शहीदांच्या कुटुंबीयांसाठी अतिशय दुर्दैवी आणि निराशाजनक असल्याचे म्हटले आहे. तसेच या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे. ते नागपूरमध्ये पत्रकारांशी बोलत होते.
“जे लोक नक्षलवाद्याविरोधात लढतात, ज्यांना आपला जीव गमवावा लागतो. ज्यांच्या विरोधात माईन्स लावून त्यांची वाहने उडवली जातात, अशा पोलिसांकरीता आणि त्यांच्या कुटुंबियांकरीता अत्यंत धक्कादायक असा हा निकाल आहे. त्यामुळे या निकालाविरोधात आम्ही सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. इतके पुरावे असतानाही एका तांत्रिक चुकीमुळे अशा व्यक्तीला सोडणे योग्य नाही. आम्ही हे सर्व सर्वोच्च न्यायालयात योग्य प्रकारे मांडू”, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
हेही वाचा – Gyanvapi Case: हिंदू पक्षकारांना झटका, ‘शिवलिंगा’ची कार्बन डेटिंग टेस्ट करण्यास न्यायालयाचा नकार
दरम्यान, नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या कारणावरून प्रा. साईबाबाला गडचिरोली जिल्हा व सत्र न्यायालयाने आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली होती. सत्र न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देत त्याने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात पुर्नविचार याचिका दाखल केली होती. दरम्यान, आज याबाबत निकाल देताना पुराव्या अभावी साईबाबा आणि त्यांच्या सहकाऱ्यांची निर्दोष मुक्तता केली.