सोमवारी वज्रमूठ सभेत बोलताना उद्धव ठाकरेंनी भाजपावर चांगलेच तोंडसुख घेतले. यावेळी त्यांच्या चंद्रकांत पाटीलांनी बाळासाहेब ठाकरे आणि बाबरी मशीदीबाबात केलेल्या विधानाचाही चांगलाच समाचार घेतला. बाबरी मशीद पाडली तेव्हा, कशी पळापळ झाली होती. हे सर्वांनाच माहिती आहे. त्यांनी चंद्रकांतदादा आणि भाजपवाले कुठे होते? अशी टीका त्यांनी केली. दरम्यान, या टीकेला आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. गडचिरोलीत माध्यमांशी बोलताना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.
काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
“बाबरी मशीद पडली तेव्हा उद्धव ठाकरे कुठं होते? हे त्यांनी आधी सांगावं. मी भाजपाचा कार्यकर्ता म्हणून तिथे उपस्थित होतो. त्यावेळी माझ्याबरोबर भाजपाचे कार्यकर्ते उपस्थित होते. मात्र, शिवसेनेचा कोणता कार्यकर्ता तिथे उपस्थित होता? याचं उत्तर आधी उद्धव ठाकरे यांनी द्यावं, असं प्रत्युत्तर देवेंद्र फडणवीस यांनी दिलं. तसेच बाबरी पडली तेव्हा उद्धव ठाकरे मुंबईच्या बाहेरसुद्धा पडले नव्हते. त्यासाठी आम्ही लढा दिला आहे. त्यामुळे मोठ्या मोठ्या गोष्टी करण्याआधी आत्मपरिक्षण करावं” असेही ते म्हणाले.
“…त्यांनी आता आम्हाला हिंदुत्त्व शिकवावं?”
पुढे बोलताना उद्धव ठाकरेंनी हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावरून केलेल्या टीकेलाही त्यांनी प्रत्युत्तर दिलं. “जे लोक आता हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे म्हणण्याऐवजी जनाब बाळासाहेब ठाकरे म्हणायला लागले आहेत. त्यांनी आता आम्हाला हिंदुत्त्व शिकवावं, हे आश्चर्यकारकच आहे”, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
वज्रमूठ सभेवरही केली टीका
दरम्यान, महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेवरही त्यांनी टीकास्र सोडलं. “महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा म्हणजे निराश लोकांचं अरण्यरुदन आहे. सत्ता गेल्याने हे लोक निराश आणि बावचळलेले आहेत. त्यांचा आता तोल जातोय. त्यामुळे अशा लोकांनी टीका केल्यानंतर ती किती गांभीर्याने घ्यायची, याचा विचार आता आपण सर्वांनी केला पाहिजे”, असे ते म्हणाले.