राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन उद्यापासून उपराजधानी नागपुरात सुरू होत आहे. तत्पूर्वी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येस सत्ताधारी विरुद्ध विरोधकांमध्ये पत्रकारपरिषदेच्या माध्यमातून टीका, टिप्पणीला सुरूवात झाल्याचे आज दिसून आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आयोजित केलेल्या चहापानावर बहिष्कार टाकत विरोधकांनी आज पत्रकारपरिषदेतून विविध मुद्य्यांवरून सत्ताधारी शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली. विरोधी पक्षनेते अजित पवार यांन यावेळी महापुरुषांबाबत करण्यात आलेल्या वक्तव्यांवरून सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. त्यांच्या या टीकेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारच्या पत्रकारपरिषदेतूनच प्रत्युत्तर दिलं.
उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “महापुरुषांच्या अपमानाबाबत अजित पवारांनी केलेल्या टीकेवर बोलताना उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, मला कधी कधी आश्चर्य वाटतं, की छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांना पुरावा मागणारे, मांडीला मांडी लावून बसतात आणि महापुरुषांच्या अपमानाबद्दल हे बोलतात. वारकरी संतांबद्दल अतिशय हीन दर्जाने बोललं जातं. त्यांना मंचावर घेऊन हे महापुरुषांच्या अपमानाबद्दल बोलतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म कुठे झाला? हेदेखील माहिती नाही.”
याशिवाय, “मला असं वाटतं की खऱ्या अर्थाने या संदर्भात बोलण्याचा अधिकार हा तुम्हाला नाही. महापुरुषांचा अवमान कोणीही करू नये. छत्रपती शिवराय आणि महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे महाराष्ट्राचं दैवत आहे. पण त्याचं राजकारण करण्याचा जर प्रयत्न कोणी केला, तर त्याला तसच उत्तर हे देण्याची क्षमतादेखील आमची आहे. म्हणून याही संदर्भात योग्य उत्तर देण्यासाठी आम्ही तयार आहोत.” असंही यावेळी फडणवीसांनी म्हटलं.
अजित पवार काय म्हणाले होते? –
“मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधी पक्षांच्या नेत्यांसाठी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येस चहापानाचा कार्यक्रम आयोजित केला होता. राज्याच्या विकासाच्या दृष्टीने मनमोकळी अनौपचारिक चर्चा होईल, या हेतूने आम्हाला बोलावलं होतं. पण आम्ही आता सगळ्यांनी चर्चा केली, त्या चर्चेत साधारण सहा महिने झाले हे सरकार सत्तेवर येऊन, या कालावधीत ज्या काही अपेक्षा होत्या पूर्ण झाल्यात असं आम्हाला अजिबात वाटत नाही. महापुरुषांबाबत सातत्याने बेताल वक्तव्यं करणं, अपशब्द बोलणं हे सतत सुरूच आहे. राज्यपाल, मंत्री, आमदार हे बोलत आहेत आणि त्यात भर टाकण्याचंच काम करत आहेत. काही बाबतीत माफी मागण्यासही तयार नाहीत. हे महाराष्ट्राला अजिबात पसंत नाही. हा एक आमचा मुद्दा आहे. ”