दीक्षाभूमीवर ५९व्या धम्मचक्र प्रवर्तन वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, व्यासपीठावर भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, कर्नाटकाचे सामाजिक कल्याणमंत्री एच. अंजय्या, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, माजी मंत्री शिवाजीराव मोघे आणि महापौर प्रवीण दटके उपस्थित होते.
राज्याचे मुख्यमंत्री, मंत्री आणि केंद्रातील मंत्री व्यासपीठावर उपस्थित असताना कर्नाटकातील काँग्रेसप्रणीत सरकारने दीक्षाभूमीसाठी पाच कोटींची घोषणा करून बाजी मारली असे वाटत असतानाच दीक्षाभूमीला जागतिक दर्जाची वास्तू बनवण्यासाठी जागा आणि निधी कमी पडू दिला जाणार नाही, अशी ग्वाही देत मुख्यमंत्र्यांनी कर्नाटक मंत्र्यांवर वरकडी केली.
दीक्षाभूमीवर ५९व्या धम्मचक्र प्रवर्तन वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कर्नाटकाचे सामाजिक कल्याणमंत्री एच. अंजय्या यांच्या जुगलबंदीने श्रोते सुखावले. अंजय्या यांच्या सडेतोड भाषणाला केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी सडेतोड उत्तर देतील असे वाटत असतानाच आधी चार ठिकाणी केलेली बौद्ध सर्किटची योजनाच त्यांनी कार्यक्रमात सादर केली आणि चेंडू मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात टाकून जबाबदारी झटकली. अंजय्या यांचे कन्नडमधील भाषण आणि नंतर त्याचे हिंदीतील अनुवाद कार्यक्रमाचे आकर्षण ठरले. अध्यक्षस्थानी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई होते. व्यासपीठावर नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, माजी मंत्री शिवाजीराव मोघे आणि महापौर प्रवीण दटके उपस्थित होते.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, नुकत्याच झालेल्या जपानमधील कार्यक्रमाचा हवाला देत तेथे बौद्ध धर्माचा प्रसार करणारे नागार्जुन यांचे रामटेकमध्ये वास्तव्य या अनुषंगाने जपानशी आपला संबंध आहे. महामानवाने सव्वाशे कोटी जनतेला जगण्याचा हक्क मिळवून दिला त्यांच्यासाठी इंदू मिलमध्ये सव्वा इंच जागा मिळू नये, अशी खंत व्यक्त करीत गेल्या १५ वर्षांपासून त्यासंबंधीची फाईल फिरत होती. मात्र, पंतप्रधान मोदींनी चुटकीसरशी विषय सोडवल्याची आर्थिक विषमतेच्या परिस्थितीत डॉ. आंबेडकरांचे आर्थिक विचारच देशाला तारू शकतात म्हणून लंडन येथील वास्तूत डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन सुरू करून तेथे अर्थशास्त्र संशोधनाचा अभ्यासक्रम सुरू करण्याची घोषणा केली. विधि शाखेचा विद्यार्थी असून संविधानाने नेहमीच आकृष्ट केले आहे. २१व्या शतकातील गरिबी, शेतकरी, भूकबळी, उद्योग या आव्हानांची उत्तरे बाबासाहेबांनी संविधानात नमूद केली आहेत. गोरगरिबांना व्यसनापासून मुक्त करण्यासाठी व्यसनमुक्ती धोरण शासनाने प्रभावीपणे राबवावे, असे आवाहन माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांनी केले. बडोले आणि दटके यांची भाषणे झाली. संचालन अर्चना मेश्राम आणि भुवनेश्वरी मेहरे यांनी केले तर समिती सदस्य विलास गजघाटे यांनी आभार मानले.