नागपूर : मराठा समाजाच्या आरक्षण आंदोलनादरम्यान ३० ऑक्टोबरला बीड आणि माजलगाव शहरात विविध ठिकाणी झालेल्या जाळपोळीच्या घटनांची विशेष तपास पथकामार्फत (एसआयटी) चौकशी करण्यात येईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी विधानसभेत केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बीडमध्ये मराठा आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसाचारासंदर्भात संदीप क्षीरसागर, जयंत पाटील यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेवरील चर्चेदरम्यान फडणवीस बोलत होते. माजलगाव आणि बीड येथील घटनांप्रकरणी ज्यांच्याविरुद्ध सबळ पुरावा आहे, त्यांना अटक करण्यात आली आहे. आरोपींचे मोबाईल लोकेशन, व्हॉट्सअ‍ॅप संदेश तपासण्यात आले आहेत. फरार आरोपींच्या विरोधातही पोलिसांकडे सबळ पुरावे आहेत. हा हल्ला पूर्वनियोजित होता का? त्याचा सूत्रधार कोण आहे, याबाबतही चौकशी करण्यात येत आहे, असे फडणवीस म्हणाले.

हेही वाचा >>> मुख्यमंत्री, मंत्रीही लोकायुक्तांच्या कक्षेत; लोकायुक्त सक्षम करणाऱ्या विधेयकाला विधान परिषदेची मान्यता   

पोलीस हतबल होते : क्षीरसागर

यावेळी भावूक झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी जाळपोळीच्या दिवसाचा सर्व वृत्तांत सभागृहात कथन केला. ते म्हणाले, ‘‘घटनेच्या दिवशी मी बाहेर होतो. माझे घर पोलीस मुख्यालयाच्या समोर आहे. दारात पोलिसांची गाडी होती. मात्र घरावर हल्ला झाला तेंव्हा पोलिसांची गाडीही तेथून निघून गेली. मी पोलीस अधीक्षक आणि अधिकाऱ्यांना सतत फोन करूनही मदत मिळाली नाही. घर जळत असताना कुटुंब घरात अडकले होते. ते नशीब बलत्तर म्हणून वाचले.’’ सात-आठ तास शहरात पोलिसांच्या देखत जाळपोळ सुरू होती. पण पोलीस काहीही करत नव्हते. आज राज्यात आमदारांची ही अवस्था असेल तर सामान्य माणसांची काय अवस्था होईल, अशी व्यथा क्षीरसागर यांनी व्यक्त केली. 

अद्याप १०१ आरोपी फरार

आतापर्यंत २७८ आरोपींना अटक करण्यात आली आहे. यांपैकी ३० जण सराईत गुन्हेगार आहेत. त्यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल आहेत. अजूनही माजलगाव प्रकरणातील ४० आणि बीड प्रकरणातील ६१ संशयित आरोपी फरार आहेत. त्यांच्या अटकेचे प्रयत्न सुरू आहेत, असे फडणवीस यांनी सांगितले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Devendra fadnavis says sit to probe arson in beed during maratha quota stir zws